पनवेलमधील प्रलंबित विकासकामांना गती
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देणे आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची प्रभावी सोडवणूक करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत शेकाप नेते तथा माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध भागांतील रस्ते, गटारे, रिंग रोड तसेच झोपडपट्टी परिसरातील नागरी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेत पनवेल महानगरपालिकेमधील पडघे, रोहिजण, धरणा कॅम्प आणि नावडे परिसरातील अंतर्गत रस्ते व गटारांच्या विकासकामांचा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. या भागांतील प्रलंबित कामे मार्गी लावून नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. वळवली आणि टेंभोडे परिसराला जोडणारा रिंग रोड तयार करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी या मार्गाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, नावडे झोपडपट्टी परिसरातील पुलाजवळील काँक्रीटीकरण, झोपडपट्टी पुनर्वसन तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या पाणी, रस्ते, गटारे आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवून विकासकामांना गती देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच, यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वेगाने वाढत असलेल्या लोकसंख्येच्या अनुषंगाने दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या बैठकीला शेकाप नेते तथा माजी आमदार बाळाराम पाटील, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवेंद्र मढवी, नगरसेवक राम पाटील, नगरसेवक लतीफ शेख, नगरसेविका योगिता फडके, नगरसेविका मनीषा म्हात्रे, नगरसेवक आर्या जाधव, नगरसेविका अर्चना भोईर, दिलीप कदम तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.







