बाळाराम पाटील यांची फेरनिवड

‌‘रयत‌’च्या रायगड विभागाचे चौथ्यांदा चेअरमन; पनवेलमध्ये भव्य सत्कार

| पनवेल | प्रतिनिधी |

आशिया खंडातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागीय चेअरमनपदी माजी आमदार बाळाराम पाटील यांची चौथ्यांदा फेरनिवड झाली. याबद्दल त्यांचा पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य सत्कार करण्यात आला.

आमदार दत्तूशेठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभात समितीचे सभापती नारायण घरत आणि सचिव प्रकाश नाईक यांच्या हस्ते बाळाराम पाटील यांचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम 29 मे रोजी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

सत्काराला उत्तर देताना बाळाराम पाटील यांनी रायगड विभागातील शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला. रायगड विभागामध्ये ठाणे, रायगड, पनवेल, पालघर, मुंबई आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा समावेश असून, या सर्व भागांतील रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अधिक प्रभावी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा चिटणीस प्रकाश म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस विलास फडके, शेकाप पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मढवी, सचिव प्रकाश नाईक, पनवेल अर्बन बँकेचे संचालक बी.पी. म्हात्रे, वामन शेळके यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाजार समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच कार्यक्रमात पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधून सेवानिवृत्त झालेले निरीक्षक प्रकाश पाटील, कनिष्ठ लिपिक पांडुरंग मोकल आणि सफाई कर्मचारी मधुकर जाधव यांचाही निवृत्तीनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना काशिनाथ पाटील यांनी बाळाराम पाटील यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, 8 मार्च 2015 रोजी नावडे येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बाळाराम पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली होती. त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागीय चेअरमनपदी निवड झाली. त्यानंतर 2017 मध्ये ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले आणि शिक्षक व शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि नेतृत्वाची दखल घेत पुणे येथे झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत त्यांच्यावर पुन्हा एकदा रायगड विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बाळाराम पाटील यांची चौथ्यांदा झालेली निवड ही त्यांच्या कार्याची पोचपावती असून, याबद्दल सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे काशिनाथ पाटील यांनी नमूद केले.

या सत्कार सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड विभागातील रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Exit mobile version