शिक्षक सेना अध्यक्ष अभ्यंकर यांचे प्रशंसोद्गार
माणगावमध्ये प्रचारसभेला प्रतिसाद
| माणगाव | प्रतिनिधी |
शेकाप आ. बाळाराम पाटील म्हणजे शिक्षकाभिमुख नेतृत्व असून, विधानपरिषदेत तेच शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकतात, असा विश्वास शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज.मा. अभ्यंकर यांनी माणगाव येथे आयोजित शिक्षक संवाद सभेत केले.
माणगाव रिव्हर लँड रिसॉर्ट उतेखोलयेथे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या 2023 च्या निवडणुकीचे महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटना, टीडीएफ, बहुजन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संसद महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुरस्कृत उमेदवार बाळाराम दत्तात्रेय पाटील यांच्या प्रचारार्थ शिक्षक प्राध्यापक यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष अभ्यंकर यांनी उपस्थित माणगाव तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी शेकापचे जेष्ठ नेते अस्लम राऊत, पनवेल को-ऑप. बँकेचे चेअरमन बाबुराव पालकर, तालुका चिटणीस रमेश मोरे, दक्षिण रायगड उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, महाड विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन मानकर, राजिपचे माजी उपाध्यक्ष संजीव जोशी, डॉ.संतोष कामेरकर, संजय घोसाळकर, प्रभाकर ढेपे, अजित चव्हाण, चेतन पोटफोडे, पद्माकर मोरे, अमित मोरे, सुरेश कुडेकर, सौ.महामुणकर, लता मुंढे, माणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास सुर्वे, महिला शेकाप तालुकाप्रमुख श्वेता गुगळे, महाड तालुकाप्रमुख शिवसेना अनिल फळसपकर, महेश गोरीवले, सुधीर सोनावणे, भरत म्हात्रे, अनिल आंबवले, तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता बक्कम, जेष्ठ नेते नाना सावंत, रामदास पुराणिक, माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, देगाव उपसरपंच दिनेश गुगुळे, तालुका शेकाप सहचिटणीस राजेश कासारे, जिल्हा चिटणीस मंडळाचे नामदेव शिंदे, गोविंद पवार, सुमित सच्चीदानंद काळे, सौरभ खैरे, स्वप्नील दसवते, देगाव सरपंच सुषमा वाघमारे यांच्यासह तालुक्यातील शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभ्यंकर पुढे म्हणाले की, बाळाराम पाटील यांनी जी कामे केली आहेत ती होलसेलमध्ये आहेत. त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस आंदोलने केली. ज्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना वेतन मिळत नव्हते अशा शिक्षणासाठी ठिय्या आंदोलन करून जोपर्यंत यासाठी अकराशे कोटी रुपयांचे अनुदान मंजूर होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच ठेवला होता. त्यामुळे शासनाला नमते घेऊन अकराशे कोटी रुपये मंजूर करावे लागले, असे नमूद केले.
शिक्षकांच्या प्रश्नांचा जाण असणारा हा पुरोगामी विचारांचा नेता आहे. त्यांना या निवडणुकीत कोकण विभागातून रेकॉर्ड ब्रेक मतदानांनी विजयी करा.
ज.मा. अभ्यंकर
यावेळी टीडीएफ संघटनेचे पदाधिकारी अनिल आंबवले, दक्षिण रायगड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, कामेरकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, मुंबई विभाग महाराष्ट्र शिक्षक सेनेचे अध्यक्ष अजित चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत बाळाराम पाटील यांना मोठ्या फरकांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात बोलताना माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे म्हणाले की, बाळाराम पाटील हे रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तसेच अध्यक्ष होते. त्यांचा राहणीमान हा साधा असून शिक्षण मतदार संघाचे कोकण विभागाचे आमदार झाल्यावरही त्यांचे पाय जमिनीवर होते. शिक्षकांचे अनेक प्रश्न त्यांनी आमदारकीच्या कारकिर्दीत मार्गी लावले आहेत. ते सर्वांना परिचित आहेत. या निवडणुकीत शिक्षक मतदारांनी सरकारी पेनचा वापर करावा आपल्याकडील पेनचा वापर करू नये कारण गेल्यावेळच्या निवडणुकीत हजारो मते बाद झाली होती. असे सांगत बाळाराम पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.