बाळाराम पाटील प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतील; आ. जयंत पाटील यांचा विश्‍वास

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळाराम पाटील हे आघाडीवर आहेत. सध्याच्या सरकारविरोधात शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. अधिवेशनाच्या काळात जुनी पेन्शन योजनेची मागणी सरकारने नाकारल्यामुळेच शिक्षकांमध्ये असंतोष आहे, असे उद्गार शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत काढले. कोकण शिक्षक मतदार संघाच्या प्रचारासाठी सध्या कोकण दौर्‍यावर आले आहेत.

महाविकास आघाडी, पुरोगामी शिक्षक संघटना, टी.डी.एफ., बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संसद, महाराष्ट्र राज्य क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुरस्कृत उमेदवार आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील यांच्या प्रचारासाठी शेकापचे आमदार जयंत पाटील, पुणे शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार सावंत प्रचार सभेसाठी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी बाळाराम पाटील यांचा विजय, होईल असा विश्‍वास व्यक्त केला.

आमदार जयंत पाटील म्हणाले की, आम्ही प्रचारासाठी जेव्हा जेव्हा शाळांमध्ये फिरलो, तेव्हा शिक्षकांनी आम्हाला वेलकम केले. गेल्या सहा वर्षात आमदार बाळाराम पाटील यांनी शिक्षकांचे आणि शिक्षणसंस्थांचे प्रश्‍न सोडवले आहेत. त्यामुळे शिक्षकवर्गाचा पाठीचा आहे. जुनी पेन्शन योजना शिक्षकांना लागू करा ही मागणी आमदार बाळाराम पाटील आणि आमदार विक्रम काळे यांनी अधिवेशनात मांडली होती. त्यावेळी सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली तर सरकारवर 2 लाख कोटी रुपयांचा बोजा पडेल असे सांगून जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही, असे उत्तर दिले होते. मी स्वतः प्रश्‍न उपस्थित केला होता. जर उद्या सरकार फायद्यात आले तर जुनी पेन्शन योजना लागू करता येईल का? त्यालाही अर्थमंत्र्यांनी असेच उत्तर दिले होते. त्यामुळे शिक्षकांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष आहे.

हे सरकार इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देत आहे. जुन्या शाळा बंद करून त्यांना खासगी शाळा सुरु ठेवायच्या आहेत, आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला. बजेटच्या 10 टक्के निधी शिक्षणावर खर्च करायचा असतो. पण सध्या राज्यात फक्त दोनच टक्के निधी शिक्षणावर खर्च केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गरीबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे सरकारचे धोरण आहे. शिक्षकांमधील असंतोष निवडणूकीतून बाहेर पडेल. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळाराम पाटील हे मताधिक्याने विजयी होतील, असा विश्‍वास आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर उपस्थित होते.

Exit mobile version