बळीराजा मशागतीच्या कामामध्ये व्यस्त

। खरोशी । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील शेतकर्‍यांनी रखरखत्या उन्हात शेतीची कामे सुरू करण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या काही दिवसातच पेरणी करावी लागणार असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात शेती मशागतीला वेग आलेला दिसत आहे.
मागील तीन वर्षापासून सतत चक्री वादळ, तौक्ते वादळी वार्‍यासह, कोरोना, नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेतकरी राजा होरपळून गेला होता. यावर्षी कोरोनाला झुंज देत शेतकरी राजा एका नव्या उमेदीने शेती कामात व्यस्त झाला आहे. तसेच यावर्षी हवामान खात्याने यावेळेस लवकर पाणी सांगितल्याने शेतकरी पुन्हा खरीपाच्या पेरणीचे नियोजन करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस हवामान बदलत असल्याने कधी ढगाळ वातावरण तर कधी पाऊस तर कडाक्याचे ऊन पडत आहे. त्यामुळे उन्हाचा पारा वाढला असला तरी बळीराजा नांगरणी, वखरणी, काटेरी झुडपे तोडून, बांध दुरुस्ती अशा कामात मग्न झाला आहे.
पेण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतीला जोडधंदा तसेच बहुतांश ठिकाणी पुरेसा सिंचन व्यवस्था नसल्याने येथील शेतकर्‍यांना खरीप हंगामावर जास्त प्रमाणात अवलंबून राहावे लागते. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रकोपात शासनाकडून लावण्यात आलेल्या लॉकडाऊन व कडक निर्बंध यामुळे शेतकरी राजा मेटाकुटीला आला होता. तरीसुद्धा तालुक्यातील शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा शेतीच्या कामाला कंबर कसली आहे. त्यामुळे त्यांनी शेती मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकरी मशागतीच्या कामाला लागला असतानाच रासायनिक खताच्या किमती गगनाला भिडल्याचे दिसून येत आहे.
मात्र त्या तुलनेत शासनाने शेत मालाचे हमी भाव वाढवला नाही. शेती साहित्य, बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशाकासह शेतात काम करणार्‍या सुद्धा मजुरांचे सुद्धा दर वाढल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीभाव नगण्यच म्हणावा लागेल. शेती कामातसुद्धा कामे करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र यावर्षी कोरोनाने स्थिती कमी झाल्याने शेतकरी राजा पावसाळपूर्वी शेतीची मशागतीची कामे करण्यात व्यस्त झाला आहे.

Exit mobile version