तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद; शेतीची कामे अंतिम टप्प्यात
| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड परिसरात गेली 4 दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. बुधवारी (दि.12) सकाळी मुरुड तहसील कार्यालयाकडून पावसाची नोंद तपासण्यात आली तेव्हा 100 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे फक्त एका दिवसात पडलेल्या विक्रमी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
मुरूड मध्ये गेले काही दिवस सोसाट्याचा वारा व पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील रस्त्यांवर पाणी साचले होते. तालुक्यात आतापर्यंत एकूण 1334 मिलीमीटर पाऊस पडला असून, सर्वात जास्त पावसाची नोंद बुधवारी (100 मि.मी.) करण्यात आली आहे. यावेळी विविध ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती. सतत पाऊस असल्यामुळे बाजरपेठा ओस पडल्या होत्या. तसेच, येथील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे एसटी वाहतुकीला सुद्धा मोठा अडसर निर्माण होत आहे. तसेच, मुरुड अलीभाग रस्त्याचे काम सुरु असल्याने प्रवास त्रासदायक होत आहे. यादरम्यान शेतीमध्ये देखील पाणी साचले आहे. त्यामुळे या पावसामुळे शेतकरी आनंदून गेला आहे. मुरुडमधील खारआंबोळी, शीघ्रे, आगरदांडा, गारंबी परिसरातील भात शेतीच्या लावण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.
यावर्षी पाऊस उशिरा झाल्याने सुरूवातीला शेतकऱ्यांचे सर्व अंदाज चुकले, सुरवातीचे राब देखील फुकट गेले. त्यानंतर पाऊस गायब झाल्याने राब लावणे जमले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा इतरांकडून राब उसने घेऊन लावणी करावी लागत आहे. यापुढे हवामान चांगले राहिले तर भात शेती चांगली होईल.
मनोज कामाने,
शेतकरी
