खरेदी विक्री संघात खत उपलब्ध
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुबार शेती केली जाते. त्याचवेळी वाहत्या पाण्यावर भाजीपाला शेती करणार्या शेतकर्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांसाठी आवश्यक असलेले युरिया खताची आवक कर्जत खरेदी विक्री संघात वाढली आहे. दरम्यान, मागील 15 दिवस खताचे कमी यामुळे बळीराजा हताश झाला होता.
कर्जत तालुक्यात राजनाला कालव्यात उन्हाळी शेती केली जाते. तेथील दुबार भातशेतीसाठी शेतकर्यांना खताची आवश्यकता जाणवत होती. त्यात कर्जत तालुक्यातील दोन बारमाही वाहत्या नद्यांमध्ये असलेल्या पाण्याचा फायदा घेत भाजीपाला शेती केली जाते. गेल्या काही वर्षात भाजीपाला शेती करणार्या शेतकर्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे शेतकरी विविध प्रकारची खते यांचा वापर भाजीपाला आणि भाताच्या शेतीसाठी करीत असतात. कर्जत तालुक्याला उन्हाळ्यात साधारण 150 टन युरिया खताची आवश्यकता असते. त्याचवेळी शेतकरी हे मिश्र खताचा वापर देखील करीत असून दोन प्रकारची मिश्र खते बाजारात उपलब्ध आहेत. मिश्र खते ही मोठ्या प्रमाणावर आणि मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, गेली काही महिने युरिया खताची कमतरता शेतकर्यांना भासत होती. तालुक्याला आवश्यक असलेला युरिया खताचा साठा कर्जत तालुक्यात उपलब्ध नव्हता. तालुक्यात ज्या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशन कडून खत उपलब्ध होते, त्यांच्याकडून आवश्यकतेपेक्षा कमी साठा उपलब्ध झाला होता.
खरेदी विक्री संघात शेतकर्यांची धूम
कर्जत तालुक्याला 150 टन युरिया खताची आवश्यकता असताना 86 टन खत फेब्रुवारी महिन्यापर्यंत उपलब्ध झाला होता. भाताचे पीक बहरू लागले असताना 50 टक्क्यांच्या आसपास खत आले असल्याने बळीराजा संकटात सापडला होता. त्यामुळे कर्जत खरेदी विक्री संघाने शेतकर्यांची गरज लक्षात घेऊन शासनाकडे खताची मागणी लावून धरली होती. त्यानंतर 14 मार्च रोजी 25 टन खताचा साठा कर्जत येथे उपलब्ध झाला आहे. खत उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच खत खरेदी करण्यासाठी शेतकरी कर्जत खरेदी विक्री संघात पोहचत आहेत.
सेंद्रिय खत उपलब्ध..
कर्जत खरेदी विक्री संघाने शेतकर्यांसाठी सेंद्रिय खत उपलब्ध करून दिले आहे. संभाजीनगर येथून ही सेंद्रिय खत कर्जत येथे आले असून साधारण 12 टन खत कर्जत मधील शेतकर्यांसाठी उपलब्ध असून त्या खताला देखील चांगली मागणी आहे. सध्या कर्जत खरेदी विक्री संघात न्यूट्री गोल्ड, नीम गोल्ड आणि कॉम्बो किट विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेतकर्यांनी आपल्या बागेतील झाडांसाठी सेंद्रिय खताची खरेदी सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे.