परतीच्या पावसामुळे बळीराजा त्रस्त

अस्मानी संकटामुळे भातशेतीत घट

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

गेले अनेक दिवस परतीचा पाउस शेतकर्‍यांच्या मुळावर उठल्यामुळे तालुक्यातील भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार झाला असून त्यातच सायंकाळी पडणारा मुसळधार पाऊस आणि सुटलेला सोसाट्याचा वारा यामुळे उभी भातशेती आडवी पडत आहे. काही ठिकाणी भातपीके कापणी योग्य झाली आहेत. मात्र, परतीचा पाऊस सायंकाळी येत असल्यामुळे भात कापणी केली तर हातामध्ये हवे तेवढे धान्य मिळणार नाही, अशी भीती शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत.

मागील आठवड्यापासून हस्त नक्षत्रांचा पाऊस शेतकरी वर्गांस मारक ठरत आहे. दरवर्षी भात लागवड करायची आणी शेवटच्या क्षणाला होणार्‍या भातशेतीच्या नुकसानामुळे मातीत टाकलेला पैसा धान्याच्या माध्यमातून मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अर्थिक संकटात सापडले आहे. सध्या भात शेती कापण्यायोग्य झाली असूनही परतीच्या पावसामुळे होणारे भातशेतीचे नुकसान नुसते पाहण्याच्या पलीकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सायंकाळी पडणार्‍या पावसामुळे भातपिकं आडवी पडत असून त्याचबरोबर शेतामध्ये पाणी जमा होत असल्यामुळे भातशेती कुजत चालली आहे.

यामुळे तालुक्यातील असलेली भातशेती अनेक ठिकाणी ओस पडत चालली आहे. याचे कारण म्हणजे मातीत टाकलेला पैसा वसूल होत नाही. शिवाय हातामध्ये हवे तेवढे धान्य मिळत नाही. तसेच, परतीच्या पावसाच्या अस्मानी संकटाचा दरवर्षी शेतकरी वर्गास सामना करावा लागत असल्यामुळे भातशेतीचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, असे असले तरी सुद्धा तालुक्यात गेल्या काही वर्षात तुरळक स्वरूपात भात लागवड करण्यास वाढ झाली आहे. मात्र, परतीच्या पावसाची दहशत आजही बळीराजाला चिंताग्रस्त करून ठेवले आहे.

Exit mobile version