मुरूडमधील बळीराजा सुखावला

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

मोसमी पाऊस येणार असल्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुरूड तालुक्यात बुधवारी (दि.19) पहाटे पावसाचे आगमन झाल्याने बळीराजासह ग्रामस्थ सुखावले आहेत. यावेळी अनेकांनी पहिल्याच मोसमी पावसात चिंब-चिंब भिजण्याचा आनंद लुटला आहे. बळीराजा तर कमालीचा आनंदित झाला आहे. तसेच, बुधवारपर्यंत 294 मिमी पाऊस पडल्याची माहिती तहसील सूत्रांनी दिली आहे.

मुरूड तालुक्यात 10 जूनला बिगर मोसमी पावसाने जनतेची अचानक दाणादाण उडवून दिली होती. तीन तासात 154 मिमी पाऊस पडला होता. त्यामुळे हा पाऊस सुरू राहील असा काहीजणांचा अंदाज सपशेल फोल ठरला होता. अखेर बुधवारी पहाटेपासून पावसाने हळूहळू जोर धरायला सुरुवात केल्याची माहिती तालुक्यातील शेतकर्‍यांनी दिला आहे. दरम्यान, तालुक्यातील भात पेरणी पूर्ण झाली असून शेतकरी वर्ग राब वर येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. पाऊस सुरू झाल्याने जमीनीला थंडावा आला असून राब वर येईपर्यंत किमान 8 दिवस तरी आम्ही शेतात गवत काढणे आणि अन्य स्वच्छता करण्याची कामे करणार असल्याची माहिती वाणदे गावचे जेष्ठ शेतकरी तुकाराम पाटील यांनी दिली.

Exit mobile version