जोरदार पावसाने बळीराजाला धडकी

हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यात मागील दोन दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, बळीराजा चिंतातुर झाला आहे. हातातोंडाशी आलेला मोत्याचा घास वरूणराजा हिरावून नेतो की काय, ही चिंता आता बळीराजाला पडली आहे.

गुरुवारी रात्रीपासून तालुक्यात धुवाँधार कोसळत असून, शुक्रवारीही दिवसभर पाऊस पडला. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली असून, शेतात मोत्यासारख्या आलेल्या भाताच्या पिकाची नासधूस होते की काय, अशी भीती त्याच्या मनात आहे. ऐन नवरात्रोत्सव काळात दमदार व विजांचा कडकडाट करत जोरदार पावसाच्या कोसळणार्‍या सरीने दांडिया खेळणार्‍या युवक युवतींचा मोठा हिरमोड झाला.

रोहा तालुक्यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटेच्या सुमारास परतीच्या पावसाने आपले रुद्ररूप धारण करत जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील धाटाव परिसरात लांढर, बोरघर, निवी, तर खांब, धामणसई, कोलाड, सुतारवाडी, चणेरा या विभागात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे याचा थेट परिणाम खरिपाच्या पिकांवर फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील काही दिवस ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर झाले असून, पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेमुळे कीटकनाशक फवारणी केली आहे. त्यामुळे शेती चांगली बहरली असून, दाणेदार लोंब्यामुळे पीकसुद्धा चांगले आहे. परंतु, पुन्हा जोरदार झालेल्या पावसात आता पिकलेली भातशेती तसेच नाचणी, वरीचे पीकदेखील धोक्यात आले असून, शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा परतीचा पाऊस हिरावून नेतो की काय ही चिंता बळीराजाला सतातवत आहे. पिकांची डोळ्यासमोर नासधूस होत असल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना पुरेशी भरपाई द्यावी.

डॉ. मंगेश सानप, कोलाड
Exit mobile version