चार संघांची घोडदौड सुरूच
। मुंबई । प्रतिनिधी ।
बळीराम क्रीडा मंडळाच्या विद्यमाने 51व्या कबड्डी महोत्सवानिमित्त काळाचौकी येथील आंबेवाडीच्या बळीराम मंडळाच्या पटांगणावर कबड्डी सामने सुरू आहेत. या स्पर्धेत बंड्या मारुती मंडळ व अमर क्रीडा (काळाचौकी) यांनी संघर्षपूर्ण लढतीनंतर पुरुष प्रथम श्रेणी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तसेच, शिवशक्ती मंडळ व लायन्स स्पोर्ट्सदेखील उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहे.
पहिल्या सामन्यात काळाचौकीच्या अमर मंडळाने शिवनेरी सेवा संघाचा कडवा प्रतिकार 32-31 असा मोडून काढला. पूर्वार्धात लोण देत 20-14 अशी आघाडी घेणार्या अमरला उत्तरार्धात मात्र शिवनेरीने लोणची परतफेड करीत चांगलेच जेरीस आणले. परंतु, संघाला विजयी करण्यासाठी ते असमर्थ ठरले. दुसर्या उत्कंठावेधक लढतीत बंड्या मारुती मंडळाने सिद्धीप्रभा फाउंडेशनला 25-24 असे चकवित आपली धोडदौड सुरूच ठेवली. क्षणक्षणाला काळजाचे ठोके चुकविणार्या या सामन्यात पहिल्या डावात 12-11 अशी नाममात्र आघाडी बंड्या मारुती संघाकडे होती. शेवटी याच गुणाचा त्यांना फायदा झाला. प्रणित देसाई, शुभम चौगुले यांच्या संयमी व धूर्त खेळीला या विजयाचे श्रेय जाते.
याच गटात शिवशक्ती मंडळाने यंग प्रभादेवीला 31-21 असे रोखत आगेकूच केली. विश्रांतीपर्यंत चुरशीने खेळाला गेलेला हा सामना नंतर मात्र थोडासा एकतर्फी झाला. वैष्णव सूर्यवंशी, विराज सोहनी यांच्या विश्रांतीनंतरच्या जोशपूर्ण खेळामुळे शिवशक्तीला हा विजय मिळविता आला. शेवटच्या सामन्यात लायन्स स्पोर्ट्सने जय दत्तगुरुचा 36-25 असा पाडाव केला. लायन्स संघाने दोन्ही डावात एक एक लोण देत आपला विजय निश्चित केला. मध्यांतराला 14-12 अशी लायन्स कडे आघाडी होती. राज आचार्यच्या चतुरस्त्र खेळामुळे हे शक्य झाले.







