मुग्धा वॉरियर्सची विजयावर मोहोर
। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
अष्टविनायक पाली येथे श्री बल्लाळेश्वर देवस्थान कर्मचारी वर्गातर्फे या वर्षी प्रथमच कर्मचारी वर्ग आणि विश्वस्तांच्या वर्गणीतून अंडर आर्म नाईट क्रिकेट स्पर्धाचे बल्लाळेश्वर देवस्थान प्रिमियर लीगचे आयोजन शनिवारी (दि.6) करण्यात आले होते. स्पर्धेत मुग्धा वॉरियर्स संघाने अंतिम विजयावर मोहर उमटवली.
या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये चार संघमालकांच्या संघानी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा पाहण्यासाठी महिला तसेच क्रीडारसिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या संघातील खेळाडू चाळिशी पार केलेले होते. मात्र, त्यांचा जोश मात्र तरुणानाही लाजवेल असा होता. दुसर्या फेरीनंतर स्पर्धेमध्ये विशेष रंग चढला होता जवळ जवळ प्रत्येक सामना हा अटीतटीचा झाला.
स्पर्धेमधील चुरशीच्या अंतिम लढतीत संघ मालक वैभव आपटे आणि पिनाकीन कुंटे यांच्या मुग्धा वॉरीयर्स या संघाने आपला बहारदार खेळ करत अंतिम विजयावर मोहर उमटवली. या संघास रोख रक्कम 5 हजार व आकर्षक चषक तर संघ मालक अमोल साठे आणि प्रमोद पावगी यांच्या अस्मि वॉरियर्स संघाला उपविजेता चषकावर समाधान मानावे लागले. त्यांना रोख रक्कम 3 हजार व आकर्षक चषक देण्यात आले. संघ मालक जितेंद्र गद्रे यांच्या अमोघ टायगर्स संघाला तृतीय क्रमांकावर तर विश्वास गद्रे आणि अरुण गद्रे यांच्या गद्रे फायटर्स संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. या दोन्ही संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या लीगमधील मालिकावीर जितेंद्र गद्रे , उत्कृष्ट फलंदाज श्रीकांत शिंदे, उत्कृष्ट गोलंदाज ललित म्हात्रे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संतोष दंत यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.