भक्तनिवास. वेबसाईट, सौर ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन
| पाली | वार्ताहर |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पैकी पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानच्या भक्तनिवास दोन इमारतीचे, नवीन वेबसाईट तसेच सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा भक्तनिवास दोनच्या प्रांगणात धर्मादाय अलिबाग प्रताप सातव, देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे याचे अध्यक्षतेखाली आणि सर्व विश्वस्त मंडळाचे उपस्थितीत मोठ्या जल्लोषात पार पडला.
श्री बल्लाळेश्वर देवस्थानने भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी भक्तनिवास बांधलेले आहेत. त्यातील भक्तनिवास क्रमांक 2 या इमारतीचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले आहे. भक्तगणांची सेवा म्हणून विविध अत्याधुनिक आवश्यक सुविधा देखील यामध्ये निर्माण केलेल्या आहेत.तसेच देवस्थानची माहिती जगभरात व्हावी व त्याद्वारे देवस्थानच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास केला जावा या उद्देशाने सर्व सुविधायुक्त नवीन वेबसाईटची निर्मिती देखील करण्यात आली असून. संपूर्ण भक्तनिवासासाठी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.
या सोहळ्याप्रसंगी देवस्थानच्या विकासाचे कृतीशील साक्षीदार ज्येष्ठ मंडळींचा आणि देवस्थानच्या कर्मचारी वर्गामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात करण्यात आले. या सोहळ्यास स्वरूप पाटील, चैतन्य कर्णिक ययाती गांधी, अभिजीत कुंटे, मिलिंद भावे, राजेश मापारा, आरिफ मनियार, पराग मेहता आदीसह अष्टविनायक देवस्थान पैकी ओझर, चिंचवड, रांजणगाव, महड येथील प्रतिनिधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सदर सोहळा यशस्वी करण्याकरिता देवस्थानचे सरपंच उपसरपंच व सर्व विश्वस्त मंडळ आणि कर्मचारी वर्गांनी विशेष मेहनत घेतली.