बलराज पनवारची संधी हुकली

आता रेपेचेजमध्ये दुसरी संधी

| पॅरिस | वृत्तसंस्था |

भारताच्या पुरुष व महिला तिरंदाजी संघाने पात्रता फेरीत दमदार कामगिरी करून उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला. पण, आज रोईंगमध्ये भारताच्या बलराज पनवारची थेट पात्रतेची संधी थोडक्यात हुकली. भारताचा रोईंगपटू बलराज पनवारने पुरुष एकल स्कलच्या हिटमध्ये 7 मिनिटे 07.11 सेकंदची नोंद करताना चौथे स्थान पटकावले. पण, त्याला उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवता आला नाही. इजिप्तचा अब्देलखालेक एलबानिया (7:05.06) तिसरा आल्याने बलराजची संधी थोडक्यात हुकली.

आता त्याला उद्या होणार्‍या रेपेजेच राऊंडमधून आगेकूच करण्याची आणखी एक संधी आहे. बलराजने चार वर्षांपूर्वीच रोईंगला सुरुवात केली आणि पॅरिसमध्ये सहभागी होणारा तो एकमेव भारतीय रोईंगपटू आहे. आशियाई स्पर्धेत थोडक्यासाठी त्याचे कांस्यपदक हुकले होते आणि यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या आशियाई व ओशियानीक रोईंग ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्य जिंकून त्याने पॅरिसचे तिकीट पटकावले होते. 25 वर्षीय बलराज सैन्यदलात कार्यरत आहे आणि तो हरयाणाच्या कैमला येथून आहे त्याला बजरंग लाल ठक्कर हे मार्गदर्शन करतात. 2008 मध्ये त्यांनी याच क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Exit mobile version