| मुंबई | प्रतिनिधी |
समुद्रात होणाऱ्या बेसुमार मासेमारीमुळे मत्स्यव्यवसाय धोक्यात आला आहे. बऱ्याच वेळा माशांची पूर्ण वाढ होऊ न देता मासे पकडण्यात येत आहेत. त्यामुळे मासळीचे प्रमाण घटून सागरी जीवसाखळी बिघडू लागली आहे. त्यासाठी मत्स्यविभागाने लहान आकारांचे मासे पकडणे आणि त्याची विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
लहान मासे म्हणजे अजून प्रजनन क्षमता न झालेले मासे असतात. त्यांना पकडल्यास ते मोठे होऊन अंडी घालू शकत नाहीत. त्यामुळे भविष्यातील मासळीचे प्रमाण घटते आणि समुद्री जैवसाखळी बिघडते. तसेच, लहान मासे हे मोठ्या माशांसाठी खाद्य असतात. त्यांची अतिविक्री किंवा पकड झाल्यास संपूर्ण सागरी खाद्यसाखळीवर परिणाम होतो. सध्या लहान मासे विकल्याने अल्पकाळ फायदा मिळतो, परंतु पुढील काही हंगामांत मोठ्या माशांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मत्स्यव्यवसायच घटतो. त्यासाठी माशांची वर्गवारी करून त्यांचा किमान आकार (एमएलएस) निश्चित करण्यात आला आहे. विक्रीसाठी लहान मासे आढळल्यास घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना दंड केला जाणार असल्याचे मत्स्यविभागाने जाहीर केले आहे. घाऊक विक्रेत्यांना 50 हजार ते 5 लाखांचा तर किरकोळ विक्रेत्यांना माशांच्या किंमतीच्या 5 पट दंड केला जाणार आहे.







