| रायगड | प्रतिनिधी |
माणगावातील भिरा गावातील देवकुंड धबधबा, सणसवाडी गावातील सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाट हा परिसर पावसाळी हंगामात पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे. सिक्रेट पॉईंट या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच, ताम्हिणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असून त्याठिकाणी दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जीवित हानी होऊ शकते. तसेच, या ठिकाणी येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात कचरा करतात. त्याचबरोबर जल आणि ध्वनीप्रदुषण देखील करत असतात. या कारणांमुळे देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाटासह आजूबाजूच्या 1 कि.मी. परिसरात दि.17 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीकरिता माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.





