कुस्ती संघटनेवरील बंदीचा मल्लांना फटका

नामवंत कुस्तीपटूंची नाराजी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय कुस्ती संघटनेवरील बंदीचा फटका कुस्तीपटूंना अधिक बसणार आहे. त्याचा परिणाम पुढील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांत भारतीय कुस्तीच्या भवितव्यावर होईल, अशी निराशा ऑलिंपिक पदक विजेता योगेश्वर दत्त तसेच आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते कर्तार सिंग यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय निवडणूक वेळेत न घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती संघटनेवर बंदी घातली. त्याचा लगचेच फटका पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपदाच्या कुस्ती स्पर्धेत भारतीय खेळाडूंना बसणार आहे.

भारतीय खेळाडू भारतीय राष्ट्रध्वजाखाली खेळू शकणार नाहीत; तसेच त्यांनी सुवर्णपदक जिंकले तरी राष्ट्रगीत वाजणार नाही. भारतीय कुस्तीगीर त्रयस्थ कुस्तीपटू म्हणून सहभागी होतील. ही जागतिक स्पर्धा 16 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

भारतीय कुस्तीवर अशी वेळ येणे हे दुर्दैव आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिज.गेल्या 6-7 महिन्यांतील घटना पाहिल्या, तर भारतीय कुस्ती बदनाम झाली आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप असो वा न्यायालयातील वाद असो, भारतीय कुस्तीचे नाव खराब झाले आहे.

योगेश्वर दत्त,कुस्तीपटू

आता लगेचच आशियाई क्रीडा स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. या स्पर्धांतून आपल्या खेळाडूंनी ऑलिंपिकसाठी कोटा मिळवला, तर हा कोटा भारताला मिळणारच नाही. दुसऱ्या देशाला दिला जाईल, हे सर्वात मोठे नुकसान असेल, अशी खंत योगेश्वरने व्यक्त केली.

संघटनेची निवडणूक हाच यावर योग्य पर्याय आहे. त्यामुळे लांबणीवर पडत असलेली निवडणूक लवकरात लवकर घ्यावी आणि आतून मार्ग काढवा. त्यामुळे आपल्या कुस्तीपटूंना चांगल्या पद्धतीने सरावही करता येईल. आपले पुढचे भवितव्य कसे असेल, हाच विचार कुस्तीपटूंच्या मनात सतत घोळत राहील. त्यामुळे त्यांना मोकळेपणाने सराव करण्यावर बंधने येत आहेत, असे योगेश्वर म्हणाला.
भारतीय कुस्ती संघटनेसाठी ही फार मोठी घडामोड आहे. निवडणूक फार काळ लांबणीवर पडत आहे. न्यायालयात पुढची तारीख 28 ऑगस्ट आहे. त्या दिवशी काही सकारात्मक निर्णय येईल, अशी अपेक्षा करुया; पण तसे घडले नाही, तर भारतीय कुस्ती आणखी संकटात येईल, अशी भीती कर्तार सिंग यांनी व्यक्त केली. महत्त्वाच्या स्पर्धा तोंडावर आलेल्या असताना गेल्या सहा-सात महिन्यांत घडत असलेल्या घटन चिंताजनक आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version