विजेसाठी ‌‘बँड बाजा बारात‌’

आंबेवाडी ग्रामस्थ पोहोचले महावितरण कार्यालयात

। नेरळ । वार्ताहर ।

तालुक्यात महावितरणकडून ग्राहकांची निराशा होत असल्याची बाब वारंवार होत आहे. एका बाजूला महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिक आंदोलनाची दिशा ठरवत असताना दुसरीकडे नेरळ जवळील आंबेवाडी येथे 3 दिवस लाईट नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. महावितरणचे अधिकारी फोन देखील उचलत नाहीत त्यामुळे संताप झालेल्या ग्रामस्थांनी आज थेट बँड बाजा घेऊन महावितरणच्या कार्यालयात वरात काढली. मात्र तिथेही अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचा पारा चढला आहे. महावितरण आम्हाला सेवा देणार की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं म्हणत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

तालुक्यात मागील काही महिन्यांपासून महावितरणकडून नागरिकांना सेवा देण्याऐवजी मनस्ताप मिळत आहे. गेले काही महिने वारंवार बत्तीगुल प्रकरणामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे या संतापातून वीज संघर्ष समिती स्थापन करून हजारोंच्या संख्येने कर्जतमध्ये मोर्चा काढत नागरिकांनी आपल्या समस्येचे निवेदन महावितरणच्या अधिकार्‍यांना दिले होते. असे असतानाही महावितरणच्या सेवेत सुधार न झाल्याने अखेर साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करत असताना देखील नेरळमध्ये आंबेवाडी ग्रामस्थांच्या विनंतीकडे महावितरणच्या नेरळ येथील अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याची घटना समोर आली आहे.

गेले काही दिवस पुन्हा मुसळधार पाऊस पडून सोसाट्याचा वारादेखील सुटला होता. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. मात्र त्यानंतर बहुतेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुरु झाला. मात्र नेरळजवळील आंबेवाडी या वाडीत गेले 3 दिवस विद्युत पुरवठा खंडित आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी अनेकदा महावितरणच्या अधिकारुणी कर्मचार्‍यांना फोन केले. मात्र आता येतो, नंतर येतो म्हणणारे नंतर फोन उचलेनासे झाले. त्यामुळे आता अखेरचा पर्याय म्हणत ग्रामस्थांनी बंद बाजाचे पथक घेऊन वाडीपासून थेट महावितरणच्या नेरळ कोतवालवाडी कार्यालयापर्यंत वरात काढली. येथे पोहोचल्यावर दाद घ्यायला तेथील कनिष्ठ अभियंता सुरेश हिंगणकर उपस्थितच नसल्याने ग्रामस्थांचा पारा चढला. महावितरण आम्हाला सेवा देणार नसेल तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावं म्हणत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

पावसाळ्यात ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तेथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा सरपटणारे प्राणी यांचा अंधारात धोका संभवतो. त्यामुळे विद्युत पुरवठा 3-4 दिवस जर सुरु होत नसेल तर हि मोठी शोकांतिका आहे. तेव्हा नवीन फिडर, रोहित्र आदी घोषणांचा पाऊस पडणारे महावितरणचे अधिकारी सध्या वाडीतला विद्युत पुरवठा सुरु शकत नसतील तर तालुक्यातील वीज समस्या सुटणार कशी असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Exit mobile version