। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यातील ध्रुवतारा फाऊंडेशनकडून दिला जाणारा मानाचा चौथा खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांचा गौरव करण्यात करण्यात आला. देशाचे भूषण खाशाबा जाधव यांना पदम्विभूषण, तर मला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा बंडा पाटील यांनी व्यक्त केली.
कोल्हापूरातील ऐतिहासिक जिल्हा परिषद संचालित मेन राजाराम हायस्कूल सभागृहात क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांच्या हस्ते बंडा पाटील यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख हजार रूपयांने सन्मान करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक मनिष झंवर, रोहित मुसळे, क्रीडा अधिकारी अरूण पाटील, प्राचार्य गजानन खाडे, लेखक संजय दुधाणे, वस्ताद बाबा महाडिक, शहाजी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय खो-खो खेळाडू सानिका चाफे, अमृता पाटील, श्रावणी पाटील, कुस्तीगीर पृथ्वीराज मोहिते, क्रीडा प्रशिक्षक भीमा भांदिगरे यांचाही या विशेष सत्कार करण्यात आला.
कोल्हापूरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूलमध्ये १९५२ काळात राजाराम महाविद्यालय भरायचे. या महाविद्यालाच्या मुख्य सभागृहात खाशाबांचा कोल्हापरकरांनी नागरी सत्कार केला होता. याच ऐतिहासिक सभागृहात खाशाबा जाधव पुरस्कार समारंभ ऑलिम्पिक दिनीच्या निमित्ताने रंगला. यावेळी कोल्हापूरातील खाशाबांच्या आठवणींना उजाळा संजय दुधाणे देत नव्या पिढीतही खाशाबा घडावा, अशी अपेक्षा टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना बंडा पाटील म्हणाले की, आमचे आदर्श खाशाबांना नावाने मला पुरस्कार मिळाला हे माझे परमभाग्य आहे. मलाही ऑलिम्पिकपटू असताना शासनाने शिवछत्रपती पुरस्कार अजून दिला नाही. तो मिळावी हीच अपेक्षा आहे. क्रीडा उपसंचालक सुहास पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, कोल्हापूरातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहे. खाशाबांप्रमाणे अनेक क्रीडापटू घडण्यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी आहे.
क्रीडा क्षेत्रातील जेष्ठ व निवोदित चार पिढींच्या उपस्थितीत खाशाबा जाधव पुरस्कार स्मरणीय झाला.
ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्कार
