सर्वोत्तम कामगिरी करीत 114 पदके जिंकली; पॅरा एशियन गेम्सचा समारोप
| जपान | वृत्तसंस्था |
एशियन पॅरा गेम्स 2026 चा समारोप समारंभ संपला आहे. जपानमधील नागोया येथे शनिवारी झालेल्या समारोप समारंभात निशाद कुमार आणि मोना अग्रवाल यांनी तिरंगा हातात घेतला. भारताने यावेळी विक्रमी 114 पदके जिंकली आणि पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. एशियन पॅरा गेम्समधील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी 2022 मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या गेम्समध्ये भारतीय संघाने 108 पदके जिंकली होती.
जपानमध्ये प्रथमच झालेल्या या स्पर्धेत 45 देशांतील सुमारे 4,000 खेळाडू आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. आशियाई पॅरा गेम्सची पहिली आवृत्ती 2010 मध्ये चीनमधील ग्वांगझू येथे झाली होती. आता 2030 मध्ये सहाव्या आशियाई पॅरा गेम्सचे यजमानपद दोहा भूषवणार आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताने विक्रमी 114 पदके जिंकल्याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, खेळाडूंच्या मेहनतीने, समर्पणाने आणि स्वतःवरील विश्वासाने हे असाधारण यश मिळवून दिले आहे.त्यांची कामगिरी तरुणांना आव्हानांना घाबरू नये, मोठी स्वप्ने पाहावीत, समर्पणाने मेहनत करावी आणि सकारात्मक राहावे, यासाठी प्रेरणा देते. निशाद कुमारने 2026 एशियन पॅरा गेम्समध्ये हाय जंप आणि लाँग जंपमध्ये सुवर्णपदके जिंकली. निशादने टोकियो आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदके जिंकली आहेत.
मोनाने जपानमधील आयची-नागोया येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये दोन सुवर्णपदके जिंकली. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग 1 स्पर्धेत 250 गुणांसह गेम्स विक्रम केला. त्यानंतर महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स 1 स्पर्धेत 357.5 गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले आणि जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
435 पदकांसह चीन अव्वल
चीन 435 पदकांसह पहिल्या स्थानावर राहिला. यजमान जपानने 186 पदके जिंकून दुसरे, तर उझबेकिस्तानने 145 पदकांसह तिसरे स्थान मिळवले. दक्षिण कोरिया 100 पदकांसह पाचव्या स्थानावर राहिला. त्याने शेवटच्या दिवशी 3 पदके जिंकली, मात्र त्यापैकी फक्त 1 सुवर्णपदक होते. त्यामुळे भारत चौथ्या स्थानावर कायम राहिला.







