बांगलादेशची झिम्बाब्वेवर मात

अवघ्या तीन धावांनी पराभव

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत रविवारी झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशने तीन धावांनी विजय मिळवला. गाबा येथील मैदानावर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या संघाने सात गडी गमावून प्रथम फलंदाजी करताना 150 धावा केल्या. बांगलादेशच्या सलामीवीर फलंदाज नजमूल हुसेन शांतोने शानदार 71 धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले.

दरम्यान, झिम्बाब्वेला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होती. एगवारा याने चौकार-षटकार खेचत सामना झिम्बाब्वेच्या पक्षात आणला होता, मात्र षटकाच्या पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. शेवटचा चेंडू नो बॉल दिल्याने झिम्बाब्वेकडे अजून एक संधी होती. पण, ब्लेसिंग मुजरबानी ना चांगला शॉट खेळू शकला, ना एकेरी धाव घेऊ शकला आणि त्यांनी हा सामना गमावला. सामनावीर तस्किन अहमद ठरला. असं पहिल्यांदाच झाले की खेळाडूंनी हातमिळवणी केली आणि परत खेळायला आले. कारण नो बॉल ठरला. पण तरीही बांगलादेशच जिंकला.

नजमुल हुसेन शांतोने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. नजमुल हुसेन शांतो शिवाय अफिफ हुसैन हा बांगलादेश संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हुसैनने 19 चेंडूत 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. नजमुल हुसेन शांतोने 55 चेंडूत 71 धावांची तुफानी खेळी केली. त्याला झिम्बाब्वेचा सिकंदर रझाने ऑफ स्पिन गोलंदाजीवर बाद केले.

Exit mobile version