पाली-सुधागडातील बँक कर्मचारी संपावर

सर्वसामान्य जनतेला फटका, व्यवहार खोळंबल्याने गैरसोय
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली असून, बँक खाजगीकरणाच्या या धोरणाला बँक कर्मचार्‍यांनी कडाडून विरोध केला आहे. त्या धोरणाविरोधात देशातील बँक कर्मचारी 16 व 17 डिसेंबर रोजी संपावर गेले आहेत. पाली सुधागड सह रायगड जिह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी दोन दिवस होणार्‍या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सहकारी बँका बंद होत्या. बँकेच्या संपाचा सर्वसामान्य जनतेला फटका बसला असून आर्थिक व्यवहार खोळंबल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील वर्षी अर्थसंकल्प सादर करताना सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याला या कामगार संघटनांमार्फत विरोध होत आहे. या विरोधामध्ये हा दोन दिवसांचा संप करण्यात येत आहे. बँक कर्मचारी संघटनांच्या संयुक्त समितीने याबाबतची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे बँकिंग लॉ विधेयक 2021लाही कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. भारतीय स्टेट बँकेने आपल्या कर्मचार्‍यांना संपात सहभागी न होण्याचे आवाहन केले होते, मात्र कर्मचार्‍यांनी ते धुडकावले आहे. त्यामुळे पालीतील स्टेट बँक व इतर बँका बंद असल्याचे दिसून आले.

Exit mobile version