रिक्त पदे भरा,अन्यथा पुन्हा संप करु

ग्राहकांच्या होणार्‍या गैरसोयी टाळण्यासाठी घेतला निर्णय; महाराष्ट्र बॅकेच्या पनवेल शाखा प्रबंधकांचा इशारा
। पनवेल । राज भंडारी ।
ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बँक व्यवस्थापनाने बँकेच्या रिक्त झालेल्या जागांवर नव्याने भरती करावी या मागणीसाठी पनवेल येथील महाराष्ट्र बँकेच्या कर्मचार्‍यांनी सोमवारी संप पुकारला. यावेळी बँक व्यवस्थापनाने जर या रिक्त जागा भरल्या नाहीत तर पुन्हा 22,23 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय संप पुकारणार असल्याचा इशारा महाराष्ट्र बँकेचे पनवेल शाखेचे प्रबंधक अरविंद मोरे यांनी दिला आहे.

महाबँकेतील सर्व कर्मचारी संघटनांनी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाण्याचा निर्णय घेवून हा संप यशस्वी पार पाडला. या संपामुळे ग्राहकांच्या होणार्‍या गैरसोयींबद्दल कर्मचार्‍यांची आपुलकी यातून समोर आली. हा संप प्रामुख्याने नोकर भरतीच्या मागणीसाठी करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बँक मृत्यू, निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती यामुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील भरत नाही. या काळात बँकेने अनेक नवीन शाखा उघडल्या, बँकेचा व्यवसाय अनेक पटीने वाढला. याचा परिणाम म्हणुन बँकेत आज 1271 अशा शाखा आहेत.

सरकारने बँकेमार्फत अनेक योजना ज्यामध्ये जनधन, अटल पेंशन, मुद्रा, स्वनिधी, विमा योजना, अनुदानाचे वाटप आदी योजना राबविल्या. यामुळे बँकित कामाचा बोजा खूप वाढला. कर्मचार्‍यांना स्वतःच्या आजारपणासाठी किंवा जवळच्या नातेवाईकांच्या आजारपणात देखील रजा मिळत नाही. यामुळे कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत. याचा ग्राहक सेवेवर देखील खूप विपरीत परिणाम होत आहे. यामुळे अनेक शाखेतून क्षमता असताना देखील व्यवसाय वाढू शकत नाही. याचा बँकेच्या व्यवसायावर देखील अनिष्ट परिणाम झाला आहे.

सर्व संघटनांनी विनंती,पाठपुरावा हे सर्व प्रयत्न विफल झाल्यानंतर नाईलाजाने हे आंदोलन सुरू केले आहे. यात कर्मचार्‍यांनी मागणी दिन पाळला. निदर्शने केली,धरणे धरली मात्र अद्यापही बँक व्यवस्थापनाने त्याची योग्य ती दखल घेतली नाही.

अरविंद मोरे, शाखा प्रबंधक
Exit mobile version