नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी हिमाचलमध्येही बॅनरबाजी

हिमाचलच्या स्पिटी व्हॅली येथे दिबांच्या नावाची ललकारी
पनवेल: साहिल रेळेकर 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद चांगलाच पेटला आहे. विमानतळाला नाव दिबा पाटील यांचे की बाळासाहेब ठाकरेंचे! या मागणीसाठी स्थानिक नेते आक्रमक झाले असून याचे पडसाद शासन दरबारी उमटले असून राजकारणही ढवळून निघाले आहे.

विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी विविध बैठका, साखळी आंदोलन आणि त्यानंतर सिडको भवन घेराव आंदोलन करण्यात आले असून यापुढे १५ ऑगस्ट पर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. एकूणच दिबांच्या नावासाठी स्थानिक, प्रकल्पग्रस्त हरतऱ्हेने प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहे. याचाच एक प्रत्यय म्हणजे पनवेल मधील काही तरुण मित्रमंडळी हिमाचल प्रदेश येथे पर्यटनासाठी गेले असून त्याठिकाणीही पर्यटन करताना मौजमजा करतानाही त्यांना दिबांचा विसर पडला नाही.

हिमाचल प्रदेश मधील स्पिटी व्हॅली येथील कुंझुम पास येथे थंड हवेचा जोरदार प्रवाह होत असताना देखील पनवेलमधील तक्का गावातील तरुणांनी दिबांच्या नावाने जोरदार ललकाऱ्या दिल्या. नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आणि फक्त दि बा पाटील साहेबांचेच देण्यात यावे यासाठी दिबांच्या नावाचा बॅनर फडकवून व जोरदार घोषणाबाजी करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वरून प्रसारित करत पुन्हा एकदा राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला आहे.पनवेलमधील केदार भगत, विनायक बहिरा, रुपेश घोणे, विराज वाघीलकर, ऍड. कपिल भोईर, वैभव बहिरा, योगेश पगडे, सागर बहिरा, नैनेश वाघीलकर, रमेश कोरडे, रत्नेश बहिरा, सचिन अपसिंगे, निलेश भोईर, केतन बहिरा, उमेश वाघीलकर, सोनल बहिरा या तरुणांनी ‘दिबा पाटील साहेबांचा विजय असो’, ‘कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणा देत हिमाचल प्रदेश मधील डोंगरकपारी दिबांच्या नावासाठी बॅनरबाजी केली.

Exit mobile version