40 ते 50 लाख गणेशमूर्तींची निर्मिती
| पेण | मुस्कान खान |
सर्वांगसुंदर व आकर्षक गणेश मूर्ती साठी प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यातील गणेशमूर्तींना गणेशभक्तांनी अधिक पसंती दिली असून, यावर्षी पेण तालुक्यात सुमारे 40 ते 50 लाख गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात आली आहे. यावर्षी दगडूशेठ हलवाई, टिटवाळा, पेशवाई, शिवरेकर, लालबागचा राजा, चिंतामणी, मोरेश्वर, अष्टविनायक, गरुडावर स्वार बाप्पा, खेकड्यावर स्वार बाप्पा तसेच सिनेमातील गाजलेल्या पात्रांचे व नेत्यांच्या बसलेल्या पद्धतीनुसार बाप्पांची निर्मिती केली गेली आहे. यासह इतर विविध प्रकारच्या गणेशमूर्तींना ग्राहकांनी पसंती दिली आहे.
बँकांकडून सुमारे 300 ते 350 कोटींचा पतपुरवठा
तालुक्यात गणेशोद्योग हा मोठ्या प्रमाणावर असून, एकेकाळी गणपती कारखानदारीला कर्ज पुरवठा करणाऱ्या बँका या छोट्या-मोठ्या होत्या. कारण, हा व्यवसाय दहा महिने भांडवलावर चालत असतो आणि 11 व्या महिन्यात व्यावसायिकाच्या हातात पैसे येतात. त्यामुळे बँका कर्ज देताना मोठ्या अडथळा निर्माण करत असत. परंतु, या उद्योगाची व्याप्ती बँकांना समजल्याने आता बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बॅक ऑफ इंडिया, एच.डी.एफ.सी., कोटक महिंद्रा बँक या राष्ट्रीयीकृत बँकांसह छोट्या-मोठ्या पतसंस्थाकडून कारखानदारांना सुमारे 300 ते 350 कोटींचा पतपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे तालुक्यातील गणेशमूर्ती उद्योगाची उलाढाल सुमारे 500 कोटींच्या पुढे होत असते.
मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती
पेण तालुक्याचा विचार करता पेण तालुक्यात सर्वात मोठा रोजगाराचे साधन गणपती उद्योग आहे. या उद्योगावर 35 ते 40 हजार व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतो. मग तो गणपती निर्मितीचा असेल, रंग काम असेल, सजावट असेल, या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या कामाचा असेल, लाऊड स्पीकर, मंडपवाले, लाईटवाले या सर्वांनाच गणपती व्यवसायामुळे रोजगार मिळत असतो.
दीड ते दोन लाख बाप्पा परदेशात रवाना
पेण तालुक्यासह ग्रामीण भागातील काहीक मोजकेच व्यावसायिक परदेशात बाप्पा आयात करतात. यामध्ये अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, दुबई, इंडोनेशिया, इंग्लड, इटली, अफगानिस्तान आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, इंडोनेशियामध्येही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, इंडोनेशियाच्या नोटीवर गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
पीओपी मूर्ती कमी बनल्याचा फटका
केंद्र सरकारच्या पीओपी मूर्तीवरील बंदीच्या धरसोड धोरणाचा फटका गणेशमूर्ती कारखानदारांना बसला आहे. पीओपीच्या मूर्ती या मातीच्या मूर्तीपेक्षा वजनाला कमी व दिसायला आकर्षक असतात. त्याच्या निर्मितीसाठी लागणारा खर्चदेखील कमी असतो. त्याचप्रमााणे त्यांची किंमतही कमी असते. तसेच हाताळण्यास व वाहतुकीसही योग्य असल्याने ग्राहक पीओपीच्या गणेशमूर्तींना पसंती देतात. परंतु यावर्षी केंद्र सरकारने पीओपी गणेशमूर्तीवरील बंदी उठवण्यासंदर्भात उशिरा निर्णय घेतल्याने यावर्षी पीओपीच्या मूर्ती कमी प्रमाणात बनल्या. परिणामी, याचा फटका गणेश उद्योगाला बसल्याची प्रतिक्रिया गणेशमूर्तीकारांनी दिली.
मूर्तीच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ
दरवर्षी महागाई ही वाढत चालल्याने त्याचा फटका गणपती उद्योगाला पडतो. या महागाईमुळे कळत-नकळत गणपतीच्या किमतीही वाढत असतात. शाडू माती, वाहतूक, रंग व कारागिरांचा खर्च वाढल्याने गणेशमूर्तीच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ गणेशभक्तांच्या खिशाला ताण देणारी ठरणार आहे.