युद्धजन्य परिस्थितीचा गणेशमूर्ती व्यवसायावर परिणाम
| पेण | प्रतिनिधी |
गणेशमूर्तींसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या पेण नगरीतील कासारळी येथील दीपक कला केंद्रातून यंदाही गणरायाच्या मूर्ती परदेशातील भाविकांसाठी रवाना झाल्या आहेत. दुबई, कॅनडा, अमेरिका (यूएसए), ऑस्ट्रेलिया यांसह विविध देशांमध्ये पेणच्या बाप्पांची मागणी कायम असून, यावर्षी या कला केंद्रातून जवळपास 15 ते 17 हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत.
पेणच्या गणेशमूर्तींना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील मराठी आणि भारतीय समुदायाकडून मोठी मागणी असते. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापर्यंत परदेशातील गणेशमूर्तींच्या बुकिंगला सुरुवात होते आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यात मूर्ती परदेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र, यंदा जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे या प्रक्रियेला विलंब झाला.
याचा परिणाम गणेशमूर्ती व्यवसायावर झाल्याचे चित्र आहे. अनेक भाविकांनी यंदा मूर्ती घेण्याचे प्रमाण काहीसे कमी केल्याचे दिसून येत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय वाहतूक, खर्च आणि परिस्थितीचा थेट परिणाम मूर्तींच्या मागणीवर जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत दीपक कला केंद्राच्या धनश्री सचिन समेळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना सांगितले की, दरवर्षी ठरलेल्या वेळेत परदेशातील बुकिंग पूर्ण होते आणि त्यानुसार मूर्ती रवाना केल्या जातात. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी असल्यामुळे बुकिंगला उशीर झाला. तरीही पेणच्या गणेशमूर्तींवरील भाविकांचा विश्वास कायम असून, मोठ्या प्रमाणात बाप्पा परदेशात रवाना झाले आहेत. पेणच्या पारंपरिक गणेशमूर्ती कलेचा जागतिक विस्तार कायम असला तरी बदलत्या जागतिक परिस्थितीचा परिणाम या व्यवसायावर जाणवत असल्याचे यंदाच्या चित्रातून स्पष्ट होत आहे.
