| पेण | प्रतिनिधी |
एसटी महामंडळातर्फे यावर्षापासून श्री गणेशोत्सवानिमित्त बाप्पांची वाहतूक करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. महाकार्गोसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पेणचे सुप्रसिद्ध गणेशमूर्ती सुखरूप आणि वेळेत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे विभागीय नियंत्रक दीपक घोडे यांनी सांगितले.
स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने पेण रामवाडी येथील विभागीय कार्यालयात घेाडे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळेला प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर लोकांना विविध सेवा किफायतशीर दराने उपलब्ध व्हावे म्हणून महामंडळाने एसटीची माल वाहतूक सेवा देखील सुरु केली आहे. या सेवेचा लाभ रेल्वे प्रमाणे शेतकऱ्याबरोबर इतर छोटया मोठया उद्येोगांनी घ्यावी हीच शासनाची अपेक्षा आहे. पेणच्या गणेशमूर्ती सातासमुद्रपलीकडे ही प्रसिध्द आहेत. त्यामुळे गणपती कारखानदारांच्या दृष्टीने आपण गणपती मूर्ती वाहतुकीसाठी या माल वाहतूक सेवेची सोय पेणमधून आपण करीत आहोत. फक्त गणपती कारखानदारांनी आमच्याशी संपर्क करुन गाडी बुक करावी, जेणेकरुन किफायती दरात आम्ही त्यांना माल वाहतूकीच्या सेवेसाठी मालवाहतूक बस उपलब्ध करुन देऊ शकू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पुढे त्यांनी हे ही सांगितले की, खासगी वाहने आणि सरकारी वाहनांच्या भाडयात मोठी तफावत असेल हे ही गणपती कारखानदारांना समजेल. तसेच महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आम्ही ही माल वाहतूक सेवा उपलब्ध करुन देउ शकतो. यंदा ही घोषण करण्यास उशीर झाला आहे. मात्र, पुढल्या वर्षापासून आपण व्यापक प्रमाणात गणपती व्यवसायीकांना माल वाहतूक एस.टी सेवा उपलब्ध करुन तसेच त्यांनी गणपती कारखानदारांना असे आवाहन केले आहे की, आपल्या मुर्ती वाहतूकीसाठी जास्तीत जास्त एस.टी.च्या सेवेचा लाभ घ्यावा.
खड्डेमुक्त बसस्थानके गणपती उत्सवाच्या अगोदर रायगड जिल्हयातील बसस्थानके खड्डेमुक्त करण्यात येतील. पावसाळयाच्या अगोदर खड्डे भरले होते. परंतु एवढया मोठयाप्रमाणात पाउस झाल्याने पुन्हा खड्डे पडले आहेत हे मी मान्य करतो. हे खड्डेमुक्त बस स्थानक गणपती उत्सवा अगोदर होतील. असा दावाही त्यांनी केला.
यावेळी पत्रकारांनी वेगवेगळया विषयासंदर्भात विचारणा करुन विभाग नियंत्रक दिपक घोडे यांचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे एस.टी बस मधील वायफाय सेवा, प्राथमिक उपचार पेटी, जी.पी.एस. सुविधा तसेच बस स्थानकातील अस्वच्छता या बाबींचा समावेश होता. या सर्व बाबींमध्ये लवकरात लवकर सुधारणा होतील, असे ही शेवटी त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.