युसूफ मेहेरअली सेंटरमधील बाप्पांची अमेरिकावारी

शाडूच्या मूर्तींना मागणी वाढली

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात मूर्तिकार व्यस्त आहेत. त्यातच शाडूच्या मूर्तींना अचानक मागणी वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्याशेजारी असलेल्या युसूफ मेहेरअली सेंटरमधील कारखान्यातील मूर्तिकारांची दमछाक होत असून, पावसामुळे मूर्ती सुकवण्यासाठीदेखील मोठी कसरत करावी लागत आहे.

ग्रामीण भागाच्या सशक्तीकरणासाठी स्थापित युसूफ मेहरअली सेंटरच्या कर्नाळा अभयारण्य परिसरातील कारखान्यात 2019 पासून शाडूच्या मातीपासून गणेशाच्या आकर्षक मूर्ती तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. सुरुवातीला 20 मूर्ती तयार करण्यापासून सुरु करण्यात आलेले हे काम आता 300 मूर्तींवर पोहोचले आहे. शासनाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये पर्यावरणाप्रति झालेली जागृती यामुळे मूर्तींच्या मागणीत दरवर्षी वाढ होत असल्याची माहिती मूर्तिकार राजेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.

सध्या ठाकूर आणि त्यांचे तीन सहकारी एप्रिल महिन्यापासूनच कारखान्यात मूर्ती घडवण्याचे काम अविरतपणे करीत आहेत. युसूफ मेहेरअली सेंटरमध्ये सध्या 8 इंचापासून दोन फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती घडवण्यात आल्या आहेत. 800 रुपयांपासून साडेचार हजार रुपयांपर्यत या मूर्तींची विक्री कारखान्यात करण्यात येत आहे.

मूर्तीची परदेशवारी
युसूफ मेहेरअली सेंटरमध्ये तयार होणार्‍या मूर्तींना दुबई येथे ही मागणी आहे. मात्र, पॅकिंग करताना येणार्‍या अडचणींमुळे यंदा दुबई येथे गणेशमूर्ती गेल्या नसल्या तरी सेंटरमधील एक मूर्ती अमेरिकेत पाठवण्यात आली असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली.
मागणीनुसार रंग
शाडूच्या मूर्ती आकर्षक रंगात रंगवल्या जात नाहीत. मात्र, काही गणेशभक्तांच्या मागणीमुळे 700 रुपये जादा दर आकारून भक्तांची मागणी पूर्ण करण्यात येत आहे.
दर जैसे थे
शाडूच्या मातीची किंमत यंदा वाढली आहे. मागील वर्षी साडेतीनशे रुपयाला 25 किलो मिळणारी मातीची गोण यंदा चारशे रुपयाला मिळत असली तरी मूर्तीचे दर मागील वर्षी इतकेच ठेवण्यात आले आहेत.
Exit mobile version