बापूजी देव यात्रा

। तळा । प्रतिनिधी ।

तळा शहरातील कुंभार आळी येथे मंगळवारी (दि.23) बापूजी देव यात्रा उत्सव पार पडणार आहे. या यात्रेला जवळपास तीनशे वर्षांचा इतिहास आहे. चैत्र पोर्णिमेला सकाळपासून कुंभार आळी येथे यात्रेला सुरुवात होते. यावेळी बापूजी देव मंदिराशेजारी विविध प्रकारची दुकाने थाटली जातात. दिवसभर ही यात्रा भरते. या यात्रेनिमित्त दोन देवतांच्या भेटीचा कार्यक्रम पार पडतो. मालाठे गावची डोनोबाची काठी कुंभार आळी येथे बापूजी देव मंदिराच्या भेटीसाठी येते.

या ठिकाणी दोन्ही काठ्यांची भेट घडवली जाते. मालाठे गावची डोनोबाची काठी कुंभार आळी ग्रामस्थ नाचवत ब्रिटिश कालीन पोलीस चौकीच्या पाठीमागे असलेल्या देवीच्या स्थानाजवळ भेटीसाठी घेऊन जातात. त्यांच्यापाठोपाठ मालाठे ग्रामस्थ देखील उपस्थित असतात. परंतु, भेटीसाठी काठी घेऊन जाण्याचा मान हा कुंभार आळी ग्रामस्थांना देण्यात आलेला असतो. देवीच्या स्थानावर भेट घेतल्यानंतर कुंभार आळी ग्रामस्थ डोनोबाची काठी मालाठे ग्रामस्थांच्या हाती सुपूर्द करतात. त्यानंतर मालाठे ग्रामस्थ डोनोबाची काठी शहराची ग्रामदेवता चंडिका देवीच्या मंदिरात घेऊन जातात. या भेटीनंतर कुंभार आळी येथील यात्रेची सांगता होते. या कार्यक्रमाप्रसंगी शहरासह तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

Exit mobile version