माथेरानच्या पर्यटनाला फटका
| माथेरान | वार्ताहर |
माथेरान मध्ये मागील दोन दिवस वळीवाच्या पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने येथील वातावरणात गारवा निर्माण केला. मात्र, या पावसाने माथेरान शहरातील वीजपुरवठा खंडित झाला असून, माथेरानची बत्ती गुल झाली आहे. स्थानिकांसह येथे आलेल्या पर्यटकांनासुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
माथेरान शहरात मागील दोन-तीन दिवसांपासून दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होत असून, येथे सोमवारी मतदानाच्या दिवशी दुपारनंतर सोसाट्याचा वारा वाहू लागला होता. त्यानंतर तासाभरातच येथील वातावरणात गारवा जाणवू लागला आणि अचानक पावसाने हजेरी लावली. मंगळवारीदेखील दुपारनंतर वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये जोरदार गारांचा पाऊस पडला.
गारांच्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या पावसामुळे स्थानिकांसह येथे पर्यटकांचीसुद्धा चांगलीच धावपळ उडाली. जवळपास अर्धा तास पडलेल्या पावसामुळे मंगळवारी वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. संपूर्ण रात्रभर माथेरान शहराची बत्ती गुल झाली होती. बुधवारी सकाळी थोड्या वेळासाठी वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. तद्नंतर कोणतीही पूर्वसूचना न देता माथेरान शहराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. असाच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने याचा परिणाम येथे माथेरान शहराच्या पाणी पुरवठ्यावरसुद्धा होत आहे.
सध्या माथेरान पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच रेलचेल आहे. मात्र, वारंवार खंडित होत असलेला वीजपुरवठा आणि यामुळे पाणीपुरवठ्याचे कोलमडलेले नियोजन यामुळे स्थानिकांसह आलेल्या पर्यटकांनादेखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज आणि पाणी या मुख्य सुविधांच्या अभावामुळे येथील हॉटेल व्यावसायिक आणि लॉजधारकांना येथे पर्यटकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
आत्ता कुठे माथेरानमध्ये पर्यटक वाढू लागले आहेत. परंतु, लाईट गेल्यामुळे दोन दिवस पाणीदेखील आले नाही. महावितरण अधिकार्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. पर्यटक माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. लाईट आणि पाणी नसल्याने पर्यटकांची सोय करता येत नाही.
निलेश परदेशी,
लॉजधारक