| तळा | वार्ताहर |
पावसाला सुरुवात होताच तळा तालुक्यातील बत्ती गुल होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. दरवर्षी पावसाच्या आगमनापासूनच तळा तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू होतो. एकदा गेलेली वीज जवळजवळ 4 ते 5 तास येत नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
पावसाळा सुरू व्हायच्या आधी महावितरण विभागाने झाडे तोडणे, बॉक्स मेंटेनन्स, ब्रेकर मेंटेनन्स, जिओडी मेंटेनन्स, जीर्ण खांब बदलणे यासारखी पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे वेळीच पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र, पावसाळा तोंडावर आला असताना देखील महावितरण विभागाची ही कामे पूर्ण झाली नव्हती. परिणामी जराजरी ढगांचा गडगडाट अथवा रिमझिम पावसाला सुरुवात होताच महावितरण विभागाकडून तळा तालुक्याची बत्ती गुल करण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात जरी नागरिकांना थंडावा जाणवत असला तरी वीज गायब असल्याने लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांना रात्रभर मच्छरांचा सामना करावा लागतो. काहीवेळा मुसळधार पावसामुळे संपूर्ण दिवसभर देखील तालुक्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो व याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून वीजबिल वसुलीसाठी महावितरण जेवढ्या तत्परतेने मेहनत घेते ती मेहनत पावसाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी का घेत नाही, असा प्रश्न देखील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.