कोहलीवर बीसीसीआयची कारवाई

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

इंडियन प्रीमिअर लीग 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 8 पैकी 7 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आणि 2 गुणांसह ते तालिकेत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत. आता स्पर्धेत कायम राहण्यासाठी त्यांनी उर्वरित सहा सामने जिंकण्यासोबतच इतरांच्या निकालांवर अवलंबून रहावे लागणार आहे. रविवारी कोलकाता नाईट रायडर्सने 1 धावेने त्यांचा पराभव केल्याने मार्गातील अडचणी आणखी वाढवल्या आहेत. त्यात अधिक भर म्हणजे स्टार फलंदाज विराट कोहलीवर बीसीसीआयने कारवाई केली आहे. 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने 221 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना विराट कोहलीच्या विकेटवरून गाजला. हर्षित राणाच्या स्लोव्हर फुलटॉसवर विराट झेलबाद झाला, परंतु विराटच्या मते तो नो बॉल होता. त्यावरून किंग कोहलीने जाहीर नाराजी व्यक्त केली आणि अम्पायरसोबत राडाही घातला. पण, नियमानुसार विराट बाद राहिला. इतकेच नाही, पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना त्याने डस्टबिनवर जोरात बॅट आदळली. त्याच्या या वागण्याची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली आणि त्याच्याकडून दंड म्हणून मॅच फीमधील 50 टक्के रक्कम वसूल केली.

Exit mobile version