निवडणुक तारखांमुळे बीसीसीआयला फुटला घाम
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बीसीसीआयची मात्र डोकेदुखी चांगलीच वाढली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणूक ही 7 टप्प्यात होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होईल तर 4 जूनला मतमोजणी होणार आहे. जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोकसभेसाठी मतदान प्रतिक्रिया सुरू राहणार आहे.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे शेड्युल जाहीर केले होते. यात 22 मार्च ते 7 एप्रिल पर्यंतच्या शेड्युलचा समावेश होता. मात्र आता दुसर्या टप्प्यातील शेड्युल जाहीर करताना निवडणुकांचा प्रत्येक ठिकाण आणि मतदानाची तारीख याची सांगड घालेपर्यंतच बीसीसीआयला घाम फुटणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हा कार्यक्रम 19 एप्रिलपासून सुरू होऊन 4 जून पर्यंत संपणार आहे. 4 जूनला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, 2 जूनपासून वेस्ट इंडीज आणि युएसएमध्ये टी 20 विश्वचषक सुरू होत आहे. त्यापूर्वी बीसीसीआयला आयपीएलचे सर्व सामने संपवणे गरजेचे आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या दुसर्या टप्प्याचे नियोजन करताना बीसीसीआयला रात्री जागून काढव्या लागणार असे दिसत आहे. पहिल्यांदाच आयपीएल आणि लोकसभा निवडणूक एकाचवेळी आलेल्या नाहीत. मात्र यंदा बीसीसीआयसमोर मोठं आव्हान असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलचे उर्वरित नियोजन हे पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते. आता ही स्पर्धा विदेशात हलवणे शक्य नाही. युएई हा चांगला पर्याय दिसत असला तरी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील तेथील वातावरण हे खूपच आव्हानात्मक असते. उष्णतेमुळे खेळाडूंना प्रचंड त्रास होऊ शकतो. तसेच पुढे टी 20 विश्वचषक असल्याने खेळाडू तंदुरूस्तीच्या बाबतीत जास्त सतर्क असतील.
आयपीएल चेअरमन अरूण धुमल यांनी आयपीएल ही भारतातच होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी 2019 चे देखील उदाहरण दिले होते. 2019 मध्ये मार्च 23 पासून मे 12 पर्यंत झाला होता. त्यावेळी निवडणुका या 11 एप्रिलपासून 19 मे पर्यंत झाल्या होत्या.
दरम्यान, लोकसभेच्या निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा दुसरा टप्पा हा युएईमध्ये होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जरी एप्रिल, मे आणि जून महिन्यात आयपीएल सामने आणि लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे टप्पे एकाचवेळी येत असले तरी जय शहा यांनी बोलताना आयपीएलचा दुसरा टप्पा हा भारतातच खेळवला जाईल असे स्पष्ट केले.