| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट बोर्ड आता लवकरच राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण प्रशासनातंर्गत येणार आहे. लोकसभेत बुधवारी (दि.23) राष्ट्रीय क्रीडा प्रशासकीय विधेयक सादर करण्यात आले. बीसीसीआयला सरकार आर्थिक मदत देणार नाही. परंतु, त्याला सर्व प्रकारच्या नियुक्त्यांसाठी आणि इतर निर्णयापूर्वी राष्ट्रीय क्रीडा मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे. क्रीडा प्रशासन विधेयकाचा उद्देश हा वेळेवर निवडणुका घेणे, प्रशासकीय जबाबदारी निश्चित करणे, खेळाडूंना सोयी-सुविधांसह त्यांच्या कल्याणासाठी एक मजबूत शिखर संघटना तयार करणे हा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आता सरकारच्या अखत्यारीत येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशासकीय विधेयक मंजूर झाल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड अंतर्गत काम करणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला त्यातंर्गत काम करावे लागेल. तसेच, नियमांचे पालन करावे लागेल. सध्या बीसीसीआय क्रीडा मंत्रालयाकडून कोणतीही मदत घेत नाही. परंतु, संसदेचे नियम बीसीसीआयला बंधनकारक आहेत.
अर्थात राष्ट्रीय क्रीडा प्रशासकीय विधेयकातंर्गत बीसीसीआय येणार असली तरी ती एक स्वायत्त संस्था असेल. परंतु, वाद वा इतर महत्त्वाच्या मुद्दावर मात्र तिला राष्ट्रीय क्रीडा बोर्डाशी चर्चा करावी लागेल. त्यांच्या निर्देशांचे पालन करावे लागेल. बीसीसीआयवरील नियुक्तांसंबंधी राष्ट्रीय क्रीडा मंडळाशी चर्चा करावी लागेल. त्यांच्या सल्ल्यानुसार काम करावे लागेल. सरकार प्रत्येक गोष्टीत थेट हस्तक्षेप करणार नाही. तर, सर्व राष्ट्रीय क्रीडा संस्था एका छताखाली आणून त्यांच्यात सुशासन आणणे हा या विधेयकाचा, बिलाचा उद्देश असल्याची माहिती मिळत आहे.
उपाध्यक्षांची सावध भूमिका
केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सावध भूमिका घेतली आहे. विधेयकावर कोणतीही स्पष्ट भूमिका न मांडता आधी त्या विधेयकाचा सखोल अभ्यास करू आणि त्यानंतर आपले मत व्यक्त करू, अशी टाळाटाळ करणारी भूमिका समोर येत आहे.राजीव शुक्ला यांनी बोलताना सांगितले की, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक संसदेत सादर झाले आहे. त्याचा सविस्तर अभ्यास केल्याशिवाय आम्ही कोणतीही भूमिका मांडू शकत नाही. आधी आम्ही हे विधेयक नीट समजून घेऊ, त्यानंतरच आपली अधिकृत भूमिका तुमच्यासमोर मांडू. या विधेयकात देशातील सर्व क्रीडा संघटनांमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि सुशासन सुनिश्चित करण्यासाठी विविध तरतुदी सुचवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सादर होणाऱ्या बिलावर लक्ष
टी-20 क्रिकेट येत्या 2028 मधील ऑलम्पिकमध्ये खेळण्यात येणार आहे. लॉस एंजिल्समध्ये ऑलम्पिक होईल. त्यात अनेक देशांचे क्रिकेट संघ खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. बीसीसीआय यापूर्वीच ऑलम्पिकचा भाग झाली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत शक्य यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, बीसीसीआय संसदेत सादर होणाऱ्या बिलावर लक्ष ठेवून आहे. त्यावर सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर याविषयी पुढील पाऊल टाकण्यात येईल, असे ते म्हणाले.







