। सुधागड-पाली । गौसखान पठाण ।
अतिवृष्टीमुळे पाली-खोपोली मार्गावरील भालगुल गावाजवळील पुलाची एक बाजू बुधवारी (दि.13) खचली. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. खोपोली बाजूकडून पालीकडे येताना भालगुल पुलाच्या सुरुवातीलाच उजव्या बाजूची माती व डांबरी भाग ढासळून खचला आहे. त्यामुळे पुलाला आधार देणार्या खांबाची (पिलर) ही बाजू कमकुवत होऊन पूल व रस्ता यामध्ये खड्डा पडून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पालीचे तहसीलदार दिलीप रायण्णावार व एमएसआरडीसी उपअभियंता सचिन निफाडे यांनी पुलाची पाहणी केली. तसेच खचलेल्या बाजूकडील मार्गावर व लोखंडी खांब व रिफ्लेक्टर पट्ट्या लावून पुलावरील या बाजूची वाहतूक बंद करून वाहतूक पुलाच्या एका बाजूने सुरू ठेवण्यात आली.
पुलाची पाहणी करण्यात आली असून योग्य त्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हा पूल धोकादायक असण्याची शक्यता नाही. तरीही पुन्हा एकदा पाहणी करण्यात येईल.
सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी