वेळीच वैद्यकिय सल्ला घेण्याचे आवाहन
| पनवेल | वार्ताहर |
जून महिन्यापासून शाळा सुरु झाल्या आणि त्यानंतर काही आठवड्यातच पावसानेही दमदार हजेरी लावली. परिणामी वातावरणात झालेला बदल, थंड वातावरण, पावसात भिजणे तसेच शाळेत एकत्र बसणे, डबा खाणे यामुळे संसर्ग वेगाने पसरुन सर्दी, खोकला, ताप तसेच जुलाबासारख्या तक्रारी घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली जात असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. पालकांनी घाबरुन न जाता वेळीच वैद्यकिय सल्ला घेण्याचे आवाहन शहरातील बालरोग तज्ज्ञांकडून केले जात आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य आणि किटकजन्य आजारांची झपाट्याने वाढ होते. पाऊस सुरू झाल्यावर हवेत निर्माण होणारा गारवा आणि पाऊस थांबल्यानंतर अचानक येणारे दमट आणि उष्ण हवामान या आजारांसाठी कारणीभूत ठरतात. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना पावसाळ्यात चटकन संसर्ग होतो. त्यांच्या वायुमार्गाचा आकार कमी असल्याने श्वासनलिका लवकर प्रभावित होतात. यामुळेच पाच वर्षांच्या आतील बालकांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असते.
पावसाळा हा विषाणुंच्या वाढीसाठी पोषक काळ मानला जातो, म्हणून या दिवसात लहान मुलांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांचे वेळोवेळी लसीकरण करणे हे त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. डायपरमुळे देखील पुरळ तसेच बुरशीजन्य संसर्ग वाढु शकतो. त्यामुळे बाळाचे डायपर दर दोन ते तीन तासांनी बदलणे आवश्यक आहे. वेळोवेळी नखं कापावीत, खेळून आल्यावर स्वच्छ हात धुणे गरजेचे आहे. मुलांना वैयक्तीक स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे. दमा न्युमोनिय फ्लु यासारख्या आजारांचे प्रमाण पावसाळ्यात वाढते, त्यामुळे पावसाळ्यापुर्वी वार्षिक इन्फ्लुएंझा लस घेणे गरजेचे आहे. तसेच, मुलांना न्युमोकोकल लस देण्यात यावी. ताप, जुलाब व उलट्या होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता बालरोग तज्ज्ञांना भेट द्यावी.
काय खबरदारी घ्याल?
पाणी उकळून प्यावे, शक्यतो घरातीलच अन्नपदार्थ खा, बाहेरचे अन्न टाळा, उबदार कपडे घालावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. विषाणूजन्य आजारांवर प्रतिजैविकांचा वापर करू नये. मुलांमध्ये ओव्हर व काऊंटर उपलब्ध असलेली खोकल्याची औषधे देऊ नये. आजारी व्यक्तीपासून मुलांना दूर ठेवावे. आपल्या मुलांपासून दुसऱ्या मुलांना संसर्ग होणार नाही.
सध्या लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप यांसारख्या विषाणूजन्य आजारांची लक्षणे आढळत आहेत. दर वर्षी पावसाळ्यात अशा प्रकारचे रुग्ण आढळतात. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून मुलांना जुलाब होत असल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे आणि गेल्या दोन महिन्याच्या तुलनेत जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून हे प्रमाण जवळपास 50 ते 70 टक्के वाढलं आहे.
डॉ. सुरेश बिराजदार, बालरोग व नवजात शिशू तज्ञ
बाळाला जुलाब होत असल्यास द्रव पदार्थांचे सेवन वाढवून मुलांना हलका आहार द्यावा, लिंबू पाणी किंवा घरच्या घरी ओआरएस बनवून पाजावे. मऊ भात, खिचडी, दही भात असा हलका आहार द्यावा. बाळाच्या शौचाची जागा लालसर दिसत असेल तर त्याठिकाणी खोबऱ्याचे तेल, रॅश क्रिमचा वापर करावा.
डॉ. नरजोहन मेश्राम, बालरोगअतिदक्षता विभाग प्रमुख