अन्यथा होणार दंडात्मक कारवाई
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, कोरोना आणि त्याच्या नवनवीन व्हेरियंटचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सुचविलेल्या उपाययोजना तसेच निर्बंधांचे पालन न करणार्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतींनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र शासनाने सुचविलेल्या उपाययोजना तसेच निबंधाचे पालन काही नागरिक करीत नसल्याचे विदारक चित्र दिसून येते. परिणामी कोरोना संसर्ग वाढू लागला आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून, ग्रामीण भागातील कोरोनाच्या ओमायक्रॉन व डेल्टा यांचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. आजही ग्रामीण भागात कौटुंबिक समारंभ, क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. नागरिक मास्क वापरत नाहीत तसेच सामूहिक अंतर पाळत नाहीत. यामुळे ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न पाळणार्यांविरोधात कारवाई मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
नियमांचे पालन न करणार्यांविरोधात दंडात्मक तसेच इतर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. तसेच लसीचे दोनही डोस घ्यावेत, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.