वर्षभरात 28 पोलीस ठाण्यातील 82 टक्के प्रकरणात तपास पुर्ण
पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांची माहिती
। अलिबाग । भारत रांजणकर ।
वर्षभरात रायगड जिल्ह्यात 28 पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, खुन, सोशल मिडीया, लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक, मारामारी दरोडा सारख्या घटना घटल्या होत्या. 2021 सालामध्ये 2 हजार 254 गुन्हे दाखल असून त्यापैकी 2 हजार 031 गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनांमुळे रायगड जिल्हा होरपळून निघाला असला तरी 82 टक्के प्रकरणात गुन्हेगारांवर तपास लावून त्यांना जेरबंद करण्यात रायगड पोलिसांना यश आले. गुन्हे प्रगटीकरणात कोकण परिक्षेत्रात रायगड पोलिस दल सर्वोतम असल्याची माहिती पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी दिली.
रायगड जिल्हा पोलिस दलाचा वार्षीक आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, पोलिस उपधिक्षक विजयकुमार सुर्यवंशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार देशमुख आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात 38 हत्येचे गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 37 प्रकरण उघडकीस आले याचे प्रमाण 97 टक्के इतके आहे. तर 20 हत्येचे प्रयत्न झाले यात सर्वच्या सर्व उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. दरोडयाचा एकच गुन्हा दाखल असून तो उघडकीस आला. चोरीच्या 23 घटनांपैकी 13 उघडकीस आल्या याचे प्रमाण 57 टक्के इतके आहे. घरफोडी आणि चोरीच्या घटनांसोबत जबरी चोरीच्या घटनांनी हैराण करून सोडले होते. जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या त्यामधील काही उघड करण्यात आल्या आहेत. तर घर फोडीच्या जिल्ह्यात 355 घटना घडल्या आहेत. यामध्ये 232 तपासावर प्रलंबीत आहेत, तर 1 वर्ष कालावधी वरील तपासावर 23 प्रलंबित आहेत.
जुगाराच्या 153, दारुबंदी 437, अंमली पदार्थ 19, अवैध अग्नी शस्त्रे 9, अवैध दारुगोळा 14 तर अनैतिक मानवी वाहतूक कारवाई 1 अशा अवैध धंद्यांवरील कारवाया करण्यात आल्या असल्याचे पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी सांगितले. या वर्षात 153 छाप्यांमध्ये 1 कोटी 37 लाख 38 हजार 846 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर 437 दारुबंदीच्या कारवायांमध्ये 52 लाख 26 हजार 469 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
2021 मध्ये रायगड जिल्ह्यात मालमत्तेचे एकुण 592 गुन्हे दाखल झाले त्यापैकी 54 टक्के म्हणजेच 317 गुन्हे उघडकीस आणून 3 कोटी 31 लाख 88 हजार 237 असा 54 टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. याचे प्रमाण कोकण परिक्षेत्रात सर्वोत्तम असल्याचेही पोलिस अधिक्षकांनी आवर्जून सांगितले.
रायगड जिल्ह्यात महिला अत्याचाराचे 147 गुन्हे दखल असून त्यापैकी 141 गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील अटक आरोपींविरुद्ध विहित वेळेत दोषारोपपत्र संबंधित न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याचेही अशोक दुधे यांनी सांगितले.







