उरणच्या किनार्यांवर तीन नंबरचा बावटा; सागरी वाहतूक बंद
| उरण | प्रतिनिधी |
जून महिन्यात समुद्राला एकूण सहा दिवस मोठी भरती असून विविध बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे सागरी प्रवासी व पर्यटक वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेट वे ते एलिफंटा, जेएनपीए, मोरा ते भाऊचा धक्का, करंजा ते रेवस या सर्वच मार्गावरील सागरी वाहतूक बंद केली आहे. यामुळे हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय झाली आहे. खराब हवामान आणि मोठ्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पावसाळ्यात 22 वेळा मोठी भरती येणार आहे. त्यापैकी जून महिन्यात समुद्राला एकूण सहा दिवस मोठी भरती असून ती या आठवड्यात आहे. त्यापैकी गुरुवारी 16 जून रोजी सर्वात मोठी भरती येणार असून त्यावेळी लाटांची उंची 4.87 मीटर असेल. त्यामुळे धोक्याच्या तीन नंबरच्या बावटा लावण्यात आला असून सागरी वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
गेटवे ऑफ इंडिया येथून पावसाळी हंगामात दररोज 1000 ते 1500 पर्यटक एलिफंटा लेण्या पाहण्यासाठी जातात. तर समुद्र सफरीचा आनंद लुटण्यासाठी 2500 ते 3000 पर्यटक येतात. मात्र सर्वच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आल्याने गेटवे ऑफ इंडिया येथून दररोज होणारी पर्यटक व प्रवासी वाहतूक रविवारपासूनच बंद करण्यात आली आहे. भाऊचा धक्का ते मोरा या सागरी मार्गावरूनही शनिवारी संध्याकाळपासूनच प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने घेतला आहे. यामुळे भाऊचा धक्का ते मोरा आणि जेएनपीए सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे दोन हजार प्रवासी व कामगारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे. बोटी बंद असल्याने प्रवासी व कामगारांना एसटी, बस, खासगी वाहनाने मुंबईत व कामाच्या ठिकाणी पोहचण्याची वेळ आली आहे. तसेच रेवस- करंजा हा मार्गही बंद ठेवण्यात येणार आहे.
बंदरात आदळणार्या व उसळणार्या उंचच उंच लाटा, फेसाळलेला समुद्र यामुळे गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटादरम्यान सागरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बेटावर रविवारीही हजारो पर्यटकांवर माघारी परतण्याची वेळ आली. त्यामुळे एलिफंटा बेटावर एकाही पर्यटकाला लेण्या पाहण्यासाठी जाता आले नाही.
नितीन कोळी, बंदर निरीक्षक
भरतीचे वेळापत्रक
तारीख लाटांची वेळ उंची (मीटर)
15 जून 4.86 दु. 12.46
16 जून 4.87 दु. 1.35
17 जून 4.80 दु. 2.25
18 जून 4.66 दु. 15.16