पनवेल, पेण, अलिबाग, माणगाव मध्ये आढळले रूग्ण
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या दोन तीन महिन्यात रायगड जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या पूर्णपणे घटली होती. फक्त पनवेल मनपा क्षेत्रातच नव्याने एखाद दुसरा रूग्ण आढलत होता. मात्र मंगळवारी पनवेल मनपा सह, पनवेल ग्रामीण आणि पेण, अलिबाग, माणगाव मध्ये एकूण 13 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेने सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे गरज निर्माण झाली आहे. सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला असून तर दिवसभरात तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सोमवारी जिल्ह्यात पनवेल मनपा क्षेत्रात सात, पनवेल ग्रामीण भागात 2, माणगाव मध्ये 2 तर पेण आणि अलिबाग तालुक्यात प्रत्येकी एक असे 13 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील तीन रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त झाले. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 463 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 689 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर गेला आहे. सद्यस्थितीत 76 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.