वरिष्ठ पोलीस निरीक्षक नदाफ यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
| अलिबाग | प्रतिनिधी |
आजच्या संगणक युगात तरुणाई सायबर गुन्ह्यांना सर्वाधिक बळी पडत असून, विशेष दक्षता घेण्याचे आवाहन सायबर पोलीस ठाणे अलिबागच्या वरिष्ठ पोलीस निरीक्ष आ.जी. नदाफ यांनी केले. ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, जे.एस.एम. कॉलेज आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्हे साक्षरता व विधी साक्षरता शिबिराचे गुरुवार, दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
या शिबिराचे यशस्वी आयोजन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, प्राचार्या डॉ. सोनाली पाटील व ॲड. नीलम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. निलम म्हात्रे यांनी केले, तर प्रा. श्वेता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. संदीप घाडगे, प्रा. डॉ.प्रेम आचार्य, प्रा. पियुषा पाटील, प्रा. कौशिक बोडस, प्रा. सूरज पुरी, प्रा. विनायक साळुंखे, प्रा. हर्षला महाजन, विधी सहाय्य बचाव पक्ष वकील प्रणालीचे प्रमुख ॲड. शेखर कामथे, ॲड. निलोफर शेख, विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराच्या प्रमुख पाहुण्या आर.जी. नदाफ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे अलिबाग यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण जी.डी.पीच्या 10 टक्के आहे, अशी माहिती दिली. मोबाईल वापरातील अटी-शर्ती काळजीपूर्वक वाचणे, अज्ञात ॲप्स व लिंक डाऊनलोड न करणे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरुणवर्ग सायबर गुन्ह्यांना सर्वाधिक बळी पडत असल्याने विशेष दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर पोलीस हवालदार राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीच्या विविध प्रकारांबद्दल प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले. मोबाईल सिम कार्ड फसवणूक, ई-केवायसी, क्रेडिट व आधार कार्ड फसवणूक, डिजिटल अरेस्ट, इन्स्टंट लोन ॲप्स तसेच व्हॉट्सॲप प्रायव्हसी यासंबंधी त्यांनी माहिती दिली. त्यांनी एनसीसीआरपी पोर्टलवर 1930 व 1945 या क्रमांकांवर तात्काळ तक्रार नोंदविता येते, सीइआयआर पोर्टलच्या माध्यमातून चोरीचा मोबाईल शोधता किंवा ब्लॉक करता येतो, याची माहिती दिली. विधी सहाय्य बचाव पक्ष वकिल प्रणालीच्या सहाय्यक ॲड. निलोफर शेख यांनी भारतीय साक्ष अधिनियम 2023, माहिती तंत्रज्ञान अधिनियम व इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्टमधील सुधारणा सविस्तर समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.







