30 जूनपर्यंत ऑरेंज अलर्टचा इशारा
| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस जोरदार पडला आहे. नदी, तलाव, विहीरींसह अनेक सखल भागांमध्ये, शेत जमीनींमध्ये पाणी साचले आहे. पावसाच्या हलक्या व जोरदार सरी कोसळत आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
रविवारी व सोमवारी असे दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहवे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यंदा पावसाने मे महिन्यातच एंट्री मारली. हा पाऊस थांबेल अशी अपेक्षा रायगडकरांना होती. परंतु, पावसाने घोर निराशा केली. पाऊस सूरूच राहिला. त्यामुळे शेत पाण्याने भरली. नदी, तलाव पाण्याने ओसंडून वाहू लागली. त्यामुळे पेरणीच्या कामांना अडथळा निर्माण झाला होता. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या थांबण्याची वाट पाहीली. तर काही शेतकऱ्यांनी रो पध्दतीने पेरणी करीत रोपे उगविण्याचा प्रयत्न केला. परंतु, या पावसाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. पेरणी करूनही रोपे पावसाच्या पाण्याने कुजली. काही ठिकाणी पेरणी करूनही रोपांची उगवण झाली नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलण्यात आले आहे.
भातांचा रोपांचा तुटवडा निर्माण होणार असल्याने अनेक भागातील शेती ओसाड होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात पावसाची रिपरीप सुरूच आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यामध्ये 29 ते 30 या दोन दिवसांच्या कालावधीत अति मुसळधार पाऊस पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. विनाकारण घरातून बाहेर पडू नका, विजेच्या अथवा झाडाच्या बाजूला थांबू नका. सखल भागात साचलेल्या पाण्याचा अंदाज घेऊनच वाहन चालवा असे आवाहन प्रशासनाकडून केले असून, दरडग्रस्त व पुरग्रस्त भागातील नागरिकांना ही याबाबत सुचना केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.







