पशुपालकांनो सावधान! ‘लम्पी स्कीन’चा वाढतोय धोका

। अलिबाग । वार्ताहर ।

गाई, म्हशींमध्ये होणार्‍या ‘लम्पी स्कीन’ या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पशुपालकांनी काळजी घ्यावी व सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. काळे यांनी केले आहे.

जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे व धुळे या जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसू आले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रायगड जिल्ह्यातील पशुधनामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. ‘लम्पी स्कीन’ हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे.

लम्पी स्कीन रोगाचा संसर्ग कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे होतो. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. डास चावणार्‍या माशा, गोचिड, चिलटे, बाधित जनावराचा स्पर्श, दूषित चारा-पाणी यामुळे या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. या रोगाने बाधित जनावरांच्या अंगावर 10 ते 20 मिलीमीटर व्यासाच्या गाठी येऊन सुरुवातीस भरपूर ताप येतो. काही जनावरात पायावर सूज येणे, लंगडणे, डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव येणे, चारा -पाणी खाणे कमी करणे अथवा बंद करणे, त्यामूळे दूध उत्पादन कमी होणे,अशी लक्षणे दिसून येतात. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न घटते. वेळीच औषधोपचार न केल्यास जनावर दगावू शकते.

आजाराच्या लक्षणांनी ग्रासित जनावर दिसून आल्यास त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून त्या जनावरावर उपचार करून घ्यावेत. त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये, यासाठी जखमेवर नियमित औषध, मलम लावावे. त्याचप्रमाणे पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घ्यावे.

लम्पी स्कीन या आजाराबाबत सावधानता व सतर्कता बाळगून आपले पशुधन सांभाळावे, जिल्हा पशुसंवर्धन विभाग सदैव शेतकर्‍यांसोबत आहे.

डॉ. काळे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन
Exit mobile version