सावधान… महिलांची छेडछाड करणे पडणार महागात

दामीनी पथकाची रोड रोमिओंवर नजर

| अलिबाग | प्रतिनिधी |

महिलांवरील अत्याचार, मुलींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी दामीनी पथक दुचाकी द्वारे रोड रोमिओंवर नजर ठेवणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वीस दुचाकी खरेदी करण्यात आल्या असून या दुचाकी गुरुवारी (दि.15) पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त हा सोहळा पोलीस मुख्यालयाच्या मैदानात पार पडला.

रायगड पोलीस दलामध्ये आठ पोलीस उपविभागीय अधिकारी, 28 पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल शाखा, भरोसा सेल अशा अनेक वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. या यंत्रणाच्या मदतीने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जातो. सायबर गुन्हेगारी रोखण्यापासून जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्यांवरदेखील अंकूश ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात काही मंडळी मुली, महिलांची छेडछाड करतात. त्यांच्यावर अत्याचार करण्याचा धोका निर्माण झाला आहे. बस स्थानक, शाळा, महाविद्यालयापासून काही अंतरावर मुली, तरुणींना गाठून त्यांची छेडछाड करण्यांवर अंकूश ठेवण्यासाठी खास महिलांच्या सुरक्षेसाठी दामीनी पथक तयार करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दामीनी पथक कार्यरत आहे. या पथकाचे कामकाज अधिक गतीमान व्हावे यासाठी महिला, तरुणांची होणारी छेडछाड, अत्याचार रोखण्यासाठी दामीनी पथक दुचाकीद्वारे रोमिओंवर नजर ठेवणार आहे. गर्दी, सार्वजनिक ठिकाणी दामीनी पथकांची दुचाकीमार्फत गस्त राहणार आहे. त्यामुळे आता महिलांची छेडछाड करणे महागात पडणार आहे.

महिला, तरुणींच्या सुरक्षेसाठी दामीनी पथक कार्यान्वीत आहे. दामीनी पथकाला जिल्हा नियोजन निधीतून दुचाकी देण्यात आल्या आहेत. गर्दी, सार्वजनिक ठिकाणी पथकाची या दुचाकीतून गस्त राहणार आहे. रोड रोमिओंवर नजर ठेवली जाणार आहे.

सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड
Exit mobile version