रायगडातील किनार्यावर राहणार तैनात
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सागरी पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असणार्या रायगडातील समुद्र किनार्यांवर रायगड पोलिसांच्या मदतीने आता बीच वॉर्डनची करडी नजर असणार आहे. देश-विदेशातून लाखो पर्यटक येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी बीच वॉर्डन ही संकल्पना राबविण्यात आली आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर तब्बल 40 बीच वॉर्डन तैनात करण्यात येणार आहेत. या बीच वॉर्डनना गणवेश आणि मानधन देण्यात येऊन उत्कृष्ट तीन वॉर्डनचा दर महिन्याला गौरव करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
जिल्ह्यातील अलिबाग, मांडवा, रेवदंडा, मुरूड, दिघी सागरी, श्रीवर्धन या पोलीस ठाणे मार्फत बिच वॉर्डन म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरूण, तरूणींची निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या तरूण, तरूणींना जिल्हा सुरक्षा शाखा यांचे मार्फत प्रशिक्षण व ओळखपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षित बीच वॉर्डन हे संबंधीत पोलीस ठाण्याच्या नियंत्रणात काम करणार आहेत. प्रत्येक बीचवर किमान 2 पुरूष व 2 महिलाबीच वॉर्डन म्हणून नेमल्या जाणार आहेत. बीच वॉर्डन हे दोन शिप्टमध्ये सकाळी 7 ते 11 वाजता आणि सायकांळी 3 ते 7 वाजता मध्ये काम करणार आहेत. समुद्रकिनारी येणार्या पर्यटकांना कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास तात्काळ त्यांना मदत करणार आहेत. बीच वॉर्डन यांनी आपले कर्तव्य बजावत असताना स्थानिक पोलीसांशी समन्वय ठेवावा लागणार आहे.