समुद्रात पोहण्याचा आनंद लुटण्यावर भर
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
शुक्रवारपासून रविवारपर्यंत सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांना पसंती दर्शविली आहे. अलिबागसह नागांव, वरसोली, काशिद अशा अनेक समुद्रकिनारी शुक्रवारपासून पर्यटक फिरण्यास आले आहेत. उन्हाचा तडाखा बसत असल्याने समुद्रात पोहण्याचा आनंद लुटण्यावर पर्यटकांनी भर दिला आहे. त्यामुळे समुद्रकिनारे फुल्ल झाल्याचे दिसून येत आहेत.

शुक्रवारी गुड फ्रायडे, शनिवार व रविवार शासकीय सुट्टीमुळे पर्यटकांनी शुक्रवारपासूनच रायगड जिल्ह्यात येण्यास सुरुवात केली. काही पर्यटक सरकारी व खासगी वाहनाने तर काही पर्यटक सागरीमार्गे प्रवासी बोटीने अलिबागमध्ये दाखल झाले. अलिबागसह नागांव, आक्षी, वरसोली, किहीम, मांडवा, आवास, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिघी अशा अनेक समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. अनेकजण समुद्राच्या लाटांच्या सानिध्यात राहून पर्यटनाचा आनंद लुटत होते. काही जण कुटूंबियांसमवेत, तर काहींनी मित्र मंडळींसमवेत समुद्रकिनारी मौजमजा केली. काहींनी घोडागाडी, एटीव्ही बाईक्सवर स्वार होऊन समुद्रकिनार्यांचा आनंद लुटला. काहींनी सागरी क्रीडांचा आनंद घेत सुट्टी उत्साहात घालविण्याचा प्रयत्न केला. किनार्यांवर पर्यटकांची गर्दी वाढल्याने किनारे पर्यटकांनी फुलून गेले.
रणगाडा ठरतोय पर्यटकांचे आकर्षण
1971 च्या लढ्यात पाकिस्तानला नामोहरम करणारा विजयाचे प्रतीक असणार्या टी-55 रणगाडा अलिबाग समुद्रकिनारी उभा करण्यात आला आहे. या रणगाड्याने भारतीय सैन्यदलात तब्बल 40 वर्षे सेवा दिली आहे. हा रणगाडा गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग समुद्रकिनारी मोठ्या दिमाखात उभा आहे. समुद्रकिनारी फिरण्यास येणार्या पर्यटकांसाठी हा रणगाडा एक आकर्षणक ठरत आहे. या रणगाड्यासमवेत फोटो काढण्याला अधिक पसंती पर्यटक देत आहेत.
अलिबाग पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी आम्ही कुटूंबियांसमवेत येतो. धकाधकीच्या जीवनात पर्यटन ही एक पर्वणी ठरत आहे. अलिबाग व अन्य समुद्रकिनारी चांगल्या सुविधा असल्याने आम्ही याठिकाणी सुट्टीच्या दिवशी येतो. सर्व दुखः विसरून समुद्रकिनार्याच्या सानिध्यात आनंद साजरा केल्याने वेगळाच उत्साह निर्माण होतो.
– अशोक पवार, पर्यटक