रायगड जिल्ह्यात पर्यटनावर परिणाम
| अलिबाग | प्रतिनिधी |
वाढते उन्ह आणि शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांचा हंगाम सुरू झाल्यामुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिकांना पर्यटकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
अलिबागजवळील वरसोली समुद्रकिनारा हा पर्यटकांच्या पसंतीचा ठिकाण मानला जातो. मात्र सध्या येथे पर्यटकांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसत आहे. नेहमी सुट्टीच्या दिवसांमध्ये गजबजलेला हा समुद्रकिनारा सध्या तुलनेने शांत दिसत असून, अनेक व्यावसायिक रिकाम्या वेळेत पर्यटकांची वाट पाहताना दिसत आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, किहीम, नागाव, काशीद अशा समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनावर मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा व्यवसाय अवलंबून आहे. हॉटेल, होमस्टे, जलक्रीडा, खाद्यपदार्थ स्टॉल, तसेच विविध पर्यटन सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना या हंगामात पर्यटकांची संख्या कमी झाल्याचा फटका बसत आहे.
स्थानिक व्यावसायिकांच्या मते, उन्हाची तीव्रता वाढल्याने तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. मात्र, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून आणि उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यानंतर पुन्हा पर्यटकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांचे अर्थकारण पर्यटकांवरच अवलंबून असल्याने सध्या त्यांना काही प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या सुट्ट्यांच्या काळात पर्यटकांचा ओघ वाढावा, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
