| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार असा सलग तीन दिवसांचा सुट्टीचा योग, तसेच शाळांच्या परीक्षा संपून लागलेल्या सुट्ट्या या दुहेरी संधीमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे.
अलिबाग, किहीम, आवास, सासवणे, वरसोली, नागाव, चौल, रेवदंडा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर आणि हरिहरेश्वर या किनाऱ्यांवर हजारो पर्यटक दाखल झाले असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने रायगडकडे वळले आहेत.
उन्हाचा कडाका वाढला असला तरी समुद्राच्या थंडगार पाण्यात डुंबत पर्यटकांनी उकाड्यावर मात करण्याचा आनंद घेतला. विशेषत: लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. समुद्रस्नानासोबतच एटीव्ही राईड्स, बोटिंग, सागरी सफर, घोडेस्वारी आणि उंट सफारी यांचा पर्यटकांनी मनसोक्त आस्वाद घेतला.
पर्यटकांची संख्या वाढल्याने हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि लॉजेस फुल्ल झाल्याचे चित्र दिसून आले. स्थानिक पर्यटन व्यवसायिकांसाठी ही गर्दी ‘सुगीचे दिवस’ ठरत असून, पर्यटन हंगाम अशा सलग सुट्ट्यांमुळे अधिकच बहरत असल्याचे दिसते. एकूणच, सुट्ट्यांचा फायदा घेत कुटुंबासह बाहेर पडण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र असून, रायगडचे किनारे पुन्हा एकदा पर्यटकांच्या गर्दीने गजबजले आहेत. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेले माथेरानही पर्यटकांनी गजबजून गेले आहे.
जिल्ह्यत गेल्या तीन दिवसात दोन लाखांहून अधिक पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अलिबागमध्ये मुंबईतून जलमार्गाने दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. दर शनिवार रविवारी गेट वे ते मांडवा दरम्यान 10 हजार प्रवाश्यांची ये-जा होत असते, यात गेल्या दोन दिवसाच जवळपास दुपटीने वाढ झाल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.
सलग सुट्ट्यामुळे अलिबाग तालुक्यात 50 हजार पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुरुड तालुक्यात 15 ते 20 हजार माथेरान येथे 15 ते 20 हजार श्रीवर्धन तालुक्यात 30 ते 35 हजार पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज आहे. ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय रित्या वाढली आहे.
सोयी सुविधांवरचा ताण वाढला
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे अर्थकारणाला चालना मिळाली असली तरी पायाभूत सुविधांवरील ताण कमालीचा वाढला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर सलग दोन दिवस वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. वाहनांची संख्या अभूतपूर्व पध्दतीने वाढल्याने, वाहतून नियमन करणे जिकरीचे ठरत आहे. मुंबई -गोवा महामार्ग, अलिबाग- वडखळ महामार्ग, दिघी -माणगाव महामार्ग आणि अलिबाग- मुरुड मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामळे पर्यटक तासंतास अडकून पडत असल्याचे चीत्र पहायला मिळत आहे.







