अनिल भोसले यांच्यावर जिवघेणा हल्ला
। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेवरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाच्या पुढे चिंचवली गावात असलेल्या रेल्वे फाटकात काही गाड्या अडकून पडल्या होत्या. त्यावेळी गाडी काढण्याच्या वादातून संवाद येथील अनिल अनंता भोसले यांना अन्य गाडीमधील चार जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या अनिल भोसले यांची नेरळ पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तक्रार दाखल करून घेतली असून एका तरुणाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल भोसले हे किरवली येथून सलवाड येथे जाण्यासाठी मध्य रेल्वेवरील चिंचवली फाटक येथून जात होते. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फाटकात झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अनिल भोसले आणि अन्य कार चालकांच्यात गाडी पुढे-मागे करण्यावरून किरकोळ बाचाबाची झाली. त्यावेळी एका पांढर्या रंगाच्या कारमधील चालकाने त्याची कार आडवी घालुन डाव्या बाजुने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या कारला पुढे जाता येत नसल्याने त्या कारमधील दोन तरुणांनी प्रथम अनिल भोसले यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळी करुन त्यांना गाडी पाठीमागे घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे अनिल भोसले यांनी आपली कार मागे घेतो, शिवीगाळी करु नका असे बोलले.
याच गोष्टीचा राग मनात धरुन त्यांनी पुन्हा शिवीगाळ करायला सुरवात केली. तसेच, गाडीतील इतर दोन व्यक्तींनी अगोदरच गाडीतुन उतरून अनिल भोसले यांच्या गाडीचे दरवाजा आणि काचेवर हाताने जोर जोरात मारण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर अनिल भोसले यांनी आपल्या गाडीच्या काचा खाली घेतल्या आणि त्यावेळी काहीही न बोलता आरोपी तरुणांनी अनिल भोसले यांना हाताचे ठोसे दिले. त्याचवेळी पांढर्या गाडी चालकाने चॉपरच्या चपट्या बाजुने अनिल भोसले यांना मारहाण करत त्यांच्या चेहेर्यावर, नाकावर आणि डोळ्याजवळ गंभीर दुखापत केली. त्यानंतर भोसले यांना स्थानिकांच्या मदतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते पनवेल येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, कर्जत उपजिल्हा रुग्णलयात अनिल भोसले हे उपचार घेत असताना नेरळचे पोलीस अधिकार्यांनी त्यांचा जाबजबाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे. तसेच, रात्री अकरा वाजता अनिल भोसले यांना मारहाण करणार्या एका तरुणाला ताब्यात घेतले असून अन्य तिघांचा शोध सुरु आहे.