। कल्याण । प्रतिनिधी ।
कल्याण येथील आधारवाडी तुरुंगात सोमवारी (दि.23) संध्याकाळी एका न्यायबंदीने एका गृहरक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गृहरक्षकाच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी न्यायबंदी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंकज यादव असे मारहाण करणार्या न्यायबंदीचे नाव आहे. विनायक भालेराव असे आधारवाडी कारागृहातील गृहरक्षकाचे नाव आहे. आधारवाडी तुरुंगातील रुग्णालय कक्षात हा प्रकार सोमवारी संध्याकाळी घडला.
गृहरक्षक भालेराव यांनी तक्रारीत म्हटले आहे, की न्यायबंदी पंकज यादव यांना तुरुंगातील मुलाखत कक्षातून घेऊन रुग्णालय कक्षात परत येत होते. दरम्यान, न्यायबंदी पंंकज यांनी गृहरक्षक भालेराव यांना, तू माझी मुलाखत पूर्ण होऊ दिली नाही. माझी मुलाखत अर्धवट राहिली, असे बोलून पंकज यांनी भालेराव यांना हातवारे करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी भालेराव यांनी तुमची मुलाखत अर्धवट राहिलेली नाही. तुम्ही माझ्याशी नीट बोला. यांनंतर पंकज यादव यांनी रागाच्या भरात गृहरक्षक भालेराव यांच्या अंगावर धाऊन त्यांंच्या सदर्याची गळपट्टी पकडली आणि शिवीगाळ करत ठोशाबुक्क्याने मारहाण केली. या झटापटीत भालेराव यांच्या गणवेशावरील शासकीय खुणांची पट्टी तुटल्याचे त्यांनी सांगितले.